Breaking News

कोळेवाडीतील गणपती मंदिराच्या दान पेटीवर चोरट्यांचा डल्ला


कराड (प्रतिनिधी) : कोळेवाडी, ता. कराड येथील गणपती मंदिर चोरट्यांनी फोडले. मंदिराच्या शटरला लावलेले कुलूप तोडून चोरट्यानी दान पेटीतील चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला. शनिवार, दि. 3 रोजी रात्री ही घटना घडली. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोळेवाडी गावच्या हद्दीत कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत असलेल्या गणपती मंदिरामध्ये गेली वीस वर्षांपासून विश्वास मोहिते हे पुजारी आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी देवाची पूजा करून दिवसभर ते मंदिर परिसरात थांबले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मंदिर बंद केले. मंदिराचे शटर लावून त्याला कुलूप घातले. त्यानंतर ते रात्री घरी गेले. रविवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुजारी मोहिते हे मंदिरात देवाच्या पूजेसाठी आले. परंतू, शटरचे कुलूप तोडून शटर उघडलेले त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी लगबगीने मंदिरात जाऊन पाहिले असता मंदिरात ठेवलेली दानपेटी तेथे दिसली नाही. पुजारी विश्वास मोहिते यांनी मंदिराच्या इकडे तिकडे पाहिले असता मंदिरासमोर दान पेटी उघडी दिसली. ते दानपेटीजवळ गेले असता दानपेटीत भाविकांनी टाकलेली चिल्लर होती. मात्र, चलनी नोटा पेटीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुजार्‍यांनी ही बाब त्वरित वसंत भोसले व ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच ग्रामस्थ मंदिरात जमा झाले. कुलूप तोडून दानपेटीतील सुमारे 40 हजार रुपये चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुजारी विश्वास दाजी मोहिते यांनी याबाबत कराड तालुका पोलिसात तक्रार दिली आहे.