Breaking News

केंद्र व राज्याच्या मंत्र्यांतील वाद शिगेला मनेका गांधी-मुनगंटीवारांचे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप

मुंबई (प्रतिनिधी)ः यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे टी-1 ‘अवनी’ या वाघिणीला ठार केल्यानंतर राज्य सरकार आणि खास करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. टीका करणार्‍यांमध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर असून मुनगंटीवारदेखील त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देत आहेत. वनखात्यला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती असे सांगत त्यांनी वन खात्याच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वनखात्याच्या एका अधिकार्‍याने मात्र शार्प शूटरवरच आक्षेप घेतला आहे. 

मनेका गांधी यांनी वाघिणीला ज्याने गोळया घातल्या, त्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा उल्लेख केला. त्याला उत्तर देण्याऐवजी श्रीमती गांधी यांच्या पिलभीत मतदारसंघात याच शूटरने नरभक्षक वाघाला ठार मारले होेते असे सांगत त्याचे समर्थन केले आहे, तर वनविभागाच्या एका अधिकार्‍यानेही शार्प शूटरने मर्यादाभंग केला. वाघिणीला गुंगीचे इंजेक्शन देणे शक्य होते, असा दावा केला आहे. मुनगंटीवार यांनी मात्र 13 जण वाघिणीच्या हल्ल्यात मारले गेल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केला. जेरबंद करताना हल्ला केल्याने गोळी घातली असल्याचे त्यांनी सांगितले. मनेका गांधींनी वनखात्याची बैठक घ्यायला हवी होती असे मत व्यक्त केले. तसेच पथक देण्याच्या मागणीकडे मनेका गाधी यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप केला. वारंवार होत असणार्‍या आरोपांमुळे वन खात्याचे खच्चीकरण होते आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले; परंतु वनखात्याच्या अधिकार्‍याने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी काहीच भाष्य केलेले नाही. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याचा आरोप केला, तो मुनगंटीवार यांनी फेटाळला. अंबानी यांचा हा प्रकल्प 60 किलोमीटर दूर असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु वने आकसल्याने तसेच त्यात खाद्य न राहिल्याने सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून दोनशे किलोमीटरपर्यंत बिबट्यांनी खाद्याच्या शोधात धाव घेतल्याचे दिसते. वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी हिंसक झाला, तर त्याला बेशुद्ध करून पकडणे असा नियम आहे. अवनीच्या बाबतीत मात्र सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले. अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आले, ही बाब निषेधार्ह आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.


यवतमाळ येथील पांढकवडा वन विभागात अवनी या वाघिणीने दहशत माजवली होती. या वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पाच शार्प शूटर, तीन मोठे पिंजरे, 500 वन कर्मचारी आणि खासगी कर्मचार्‍यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामीटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले, तरीही या वाघिणीला पकडण्यात आले नव्हते. अखेर तिचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला.