Breaking News

जिलेटिनसह डिटोनेटरच्या कारवाईने सातारा जिल्ह्यात खळबळ


सातारा :  (प्रतिनिधी) : अंगापूर फाटा ते अंगापूर रोड येथे बिनदिक्कतपणे स्फोटक पदार्थ असणार्‍या जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्या वाहतूक करणर्‍यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांविरुध्द स्फोटक पदार्थ व एक्स्प्लोझिव्ह ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी टॅक्टरसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संगममाहुली येथे जिलेटिनचा स्फोट काही वर्षापूर्वी झाला होता त्याची आठवण या कारवाईमुळे अनेकांना झाली.
अविनाश राजेंद्र जाधव (वय 27), बाजीराव शंकर जाधव (वय 29), मारुती तानाजी जाधव (वय 21, तिघे, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गोकुळ बोरसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंगापूर वंदन येथे स्फोटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन घटनास्थळी धाव घेवून छापा टाकला. यावेळी पीक क्षेत्रालगत तीन ट्रक्टर उभे होते व लागूनच विहीर खोदण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याठिकाणी जिलेटीनच्या 172 व डिटोनेटरच्या 99 या स्फोटकाच्या कांड्या सापडल्या. पोलिसांनी संशयित तिघांकडे चौकशी करुन त्या साठ्याबाबत व वाहतुकीबाबत विचारले असता ते निरुत्तर झाले. भरदुपारी पोलिसांनी केलेल्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.