Breaking News

राज्य उत्पादन शुल्ककडून दीड कोटीचा मुद्देमाल जप्त


नगर । प्रतिनिधी -
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर 2018 पर्यंत मोठया प्रमाणात अवैध मद्यावर कारवाई करुन 1 कोटी 58 लाख 71 हजार 823 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ याच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 5 विभाग व 2 भरारी पथकांनी देखील भरीव कामगिरी केली आहे.

या विभागाकडे महसूल वाढीसाठी महत्वाचे कार्य करत असताना अवैध दारुधंद्यावर कारवाई करण्याचे विभागाचे प्रमुख कार्य आहे. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत अवैध दारु धंदयावर सुमारे 958 गुन्ह्यांची नोंद केली असून यामध्ये 529 आरोपीस अटक केली आहे. त्याच्यापासून 1 लाख 73 हजार 142 लीटर रसायन जप्त करुन नष्ट करण्यात आले. या मोहिमेमध्ये 16 चारचाकी व 18 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. तसेच त्यात एक तीनचाकी वाहनाचा समावेश आहे.

विभागाचे निरीक्षक श्री. सराफ यांनी केलेल्या एका कारवाईत एक देशी कट्टा व दोन जीवंत काडतुसे जप्त करुन पोलिस विभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, अकोले, श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव, राहुरी, नेवासा व पाथर्डी या तालुक्यांत कारवाई करण्यात आली आहे.
दमण, गोवा व छत्तीसगड येथून आलेला अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या वाहनाची कारवाई आरटीओ विभागाकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात 45 अनुज्ञप्तीवर नियमभंगाचे प्रकरणे नोंदविण्यात आले असून संबंधीत अनुज्ञप्तीधारकांकडून 8 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 57 सराईत गुन्हेगारांवर 93 अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविला आहे. कोरडा दिवसाच्या दिवशी दुकाने उघडी ठेवणार्‍या 4 दुकानमालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.