Breaking News

नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवासच्या अभिनयाने दत्तवाडी शाळेतील विद्यार्थी भारावले


जामखेड ता./प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी गोरोबा चित्रमंदिर जामखेड येथे जाऊन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे निर्मित नाळ चित्रपटाचा आनंद लुटला. या चित्रपटात चैतन्यची भूमिका केलेल्या बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्या अप्रतिम अभिनयावर सर्व मुले खूष झाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्षेत्रभेटींचे महत्त्वाचे योगदान असते. चार भिंतींच्या आत दिलेल्या माहितीपेक्षा प्रत्यक्ष अनुभव व कृतीजन्य मिळालेले ज्ञान हे चिरकाल टिकते. दत्तवाडी शाळेच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. मंगळवार दि.27 नोव्हेंबर 2018 रोजी अशाच प्रकारच्या प्रेरणादायी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. 

तालुक्याची क्रीडापंढरी म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव उंडा येथील शाळाभेटीने क्षेत्रभेटीची सुरुवात झाली. येथील मुले व मुली यांच्यात झालेल्या खो-खोच्या रोमांचक सामन्याने विशेष रंगत आली. समारोपात या शाळेतील 14 वर्षे वयोगटाखालील खो-खो च्या संघात राज्यपातळीवर निवड झालेल्या कु.जनाबाई ढगे व विभागीय पातळीवर निवड झालेल्या कु.शिवानी गव्हाणे या विद्यार्थीनींना दत्तवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले अभिनंदनपर विविध ग्रेटींग्ज देऊन सन्मानित केले. यानंतर मुलांनी दु.12 ते 3 या वेळेत नाळ हा चित्रपट जामखेड येथील संत गोरोबा थिएटरमध्ये बघितला. चित्रपटानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथगड व हनुमानगड या निसर्गाच्या सानिध्यातील धार्मिक ठिकाणी जाऊन देवदर्शनासह विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. क्षेत्रभेटीची सांगता शिवनेरी अकादमीचे संस्थापक कॅप्टल लक्ष्मण भोरे यांच्या मुलाखतीने झाली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची समर्पक उत्तरे देऊन शिवनेरी अकादमी व हेल्थक्लब यांची सविस्तर माहिती देऊन त्यांनी शिक्षण, आहार, व्यायाम, देशसेवा व समाजसेवा याबाबत सखोल मार्गदर्शन करत दत्तवाडी शाळेच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले. या क्षेत्रभेटीसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी . पोपट काळे ,शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे, नान्नजचे केंद्रप्रमुख सुनील बुद्धिवंत, पिंपळगाव उंडा शाळेतील सर्व शिक्षक तसेच गोरोबा टाँकीजचे विनायक राऊत यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तर ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव उंडा येथील क्रीडामार्गदर्शक भगवान समुद्र तसेच दत्तवाडी शाळेतील मनोहर इनामदार व संभाजी सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले.