चंद्रगुप्ताचा “मोदी’’ व मोदींचा “चंद्रगुप्त’’!


बहुजनांनो.... ! 
चंद्रगुप्त आणी मोदी! काही साम्य व बरेच फरकसुद्धा! प्रदिर्घ काळाचा फरक असला तरी एक महत्वाचे साम्य आहे. तो काळ बौद्ध व जैन क्रांतीचा होता. अनेक राजे बौद्ध वा जैन धर्म स्वीकारून क्रांतीची वाट मोकळे करून देणारे होते. परंतू क्रांती जेव्हा ऐनभरात असते, त्या काळात प्रतिक्रांतीची विषवल्ली जमिनीतून बाहेर येण्यासाठी दबा धरून बसलेली असतेच. चाणक्य व त्याची ब्राह्मणी पिलावळ अंडरग्राऊंड षडयंत्रे रचित होती.

मोदिंचा काळ अत्याधुनिक असला तरी 5 हजार वर्षांपूर्वीचा राम आजही तुमच्या मानगुटीवरून खाली उतरायला तयार नाही. राज्यघटना, प्रजासत्ताक, निवडणूका, मताधिकार, स्वातंत्र्य, लोकशाही असे सर्व असतांना कोणत्याही देशात जीर्ण झालेली जातीव्यवस्था जीवंत राहूच कशी शकते? पण ती जीवंत आहे, हे वास्तव आहे. कारण प्रतिक्रांतीचे आजचे चाणक्य याच साधनांचा वापर करून जरठव्यवस्था जीवंत ठेवत आहे. 

बौद्धराजा नंद याचा कपटाने खून केल्यानंतर चाणक्याने शूद्रवर्णीय चंद्रगुप्ताला राजा बनविला. स्वतः चाणक्य वा कोणीही ब्राह्मण राजा बनू शकला असता. मात्र जैन व बौद्ध धर्मांच्या प्रभावातील शूद्रादिअतिशूद्रांच्या जागृतीमुळे ब्राह्मण राजा मान्य होणे कठीणच होते. जसे की आज ओबीसींच्या जागृतीच्या प्रभावामुळे ओबीसी-मोदींना प्रधानमंत्री बनवावे लागले. मोदींना सर्वोच्च पदावर बसवून तेथेच त्यांचा पराभव करणे म्हणजे ओबीसी जनजागृतीचा प्रभाव नष्ट करणे, ही खरी लढाई आहे. या लढाईत शासनकर्ता राजा शूद्र असला व प्रशासनकर्ता वर्ग ब्राह्मण असला तर राजाचा पराभव निश्‍चित असतो. कारकून म्हणून प्रशासनात शिरलेला ब्राह्मण जेव्हा प्रशासनकर्ता वा ‘पेशवा’ बनतो तेव्हा तो मुजोर होणे जात-स्वाभाविक आहे. पेशवा मुजोर होताच त्याने शिवाजीपासून पुढचे सर्व छत्रपती एकतर मारून टाकले किंवा जेलमध्ये सडविलेत. एकाला तर ‘पागल’ करून मारला. मोदींचेही तेच होत आहे व तसेच होत राहणार आहे. मोदींच्या सुरू असलेल्या पराभवाच्या साखळीत सर्वात शेवटी ओबीसी जागृतीचा खुन होणार आहे. एकदा का ओबीसी जागृतीचा प्रभाव खतम झाला की, मग जाणवेधारी कोणीही ब्राह्मण प्रधानमंत्री बनविला जाऊ शकतो. अशा या दिशाभुल करण्याच्या लढाईत ब्राह्मणवाद यशस्वी होत आहे. मोदी ‘चंद्रगुप्त’ नाही होऊ शकलेत. मात्र चंद्रगुप्ताचा ‘मोदी’ का झाला नाही, असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. कारण दोघांच्या काळात फार मोठे अंतर असले तरी काही महत्वपूर्ण बाबातीत साम्य आहे.
ज्याप्रमाणे चंद्रगुप्ताच्या काळात बौद्ध-जैन धर्मांच्या प्रभावात शूद्रादिअतिशूद्र जनता व बुद्धीमान जागृत होता. त्याचप्रमाणे आज फुलेशाहूआंबेडकरांच्या प्रभावात सर्वात मोठा घटक ओबीसी राजकीयदृष्ट्या जागृत झाला आहे. त्यामुळे त्याकाळात चंद्रगुप्त व आजच्या काळात मोदींना ‘’राजा’’ बनवावे लागले. 
शूद्र चंद्रगुप्ताला राजा बनविल्यानंतर चाणक्याने त्याचा पराभव करायला सुरूवात केली. त्याची दिशाभूल करू लागला. सम्राट होण्याचा मान प्राप्त झाल्यावरही चाणक्य त्याला ‘वृषभ’ म्हणूनच हिणवीत राहीला. या सांस्कृतिक संघर्षात अनेक चढउतार झालेत. अमात्य राक्षसाच्या ताब्यात प्रशासन देणे हाही एक संघर्षच होता. राक्षस नावाचा अमात्य (प्रधान) असल्याने शासन-प्रशासन जागृत शुद्रांच्या ताब्यात होते. या सांस्कृतिक संघर्षाचा शेवट चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारण्यात झाला. छत्रपती शिवाजी शाक्तधर्माचा स्वीकार करून सांस्कृतिक संघर्षात मात देत होते. पण त्यांचा खून झाला. तेच राजे संभाजींचे झाले. चंद्रगुप्ताचा ‘मोदी’ होऊ शकला नाही. कारण त्या काळात बौद्ध व जैन धर्मांच्या प्रभावात ब्राह्मणी शक्ती दहशतीत होती. संत ज्ञानेश्‍वराच्या काळापर्यंत ही दहशत बरकरार होती. ज्ञानेश्‍वर ब्राह्मण-वैदिक धर्माच्या विरोधात बंड करू शकला कारण त्या काळात अवैदिक नाथ धर्माचा दबदबा होता. ज्ञानेश्‍वराने नाथधर्माचा उघड स्वीकार करून सांस्कृतिक संघर्षाला क्रांतीचे टोक दिले. सांस्कृतिक युद्धात क्रांतिकारी महापुरूषांना ठार मारणे हा जरी रडीचा डाव असला, तरी तो युद्धाचा एक अविभाज्य बनवला गेला आहे. 
बहुजनांच्या युद्धछावणीची सर्वात मोठी कमजोरी याला कारणीभुत आहे. बहुजनांची कमजोरी ही आहे की, ते अवतारवादी आहेत. कोणीतरी अवतार घेईल व मग आपण त्याला अनुसरत गेलो की, आपले दुःख-शोषण नष्ट होईल. आपण युद्ध जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेलो असतो, मात्र विजयाच्या या उंबरठ्यावर आपल्या सरदाराचा खून झाला व त्याचे शीर तलवारीच्या टोकावर घेऊन जिंकणार्याा मावळ्यांना दाखवीले की झाले काम. सरदाराचे कापलेले मुंडके पाहताच बहुजन सैन्य सैरावैरा पळत सुटते व अशाप्रकारे जिंकलेली लढाई हरतात. सांस्कृतिक युद्धात पराभव दिसू लागताच ब्राह्मणी छावणी रडीचा डाव म्हणून शेवटचे हत्यार काढते व महापुरूषाचा (सरदारचा) खून करते. पुन्हा नवा अवतार येईपर्यंत बहुजन सैन्य सुस्त पडून राहते. या सुस्तीच्या काळात ब्राह्मण छावणी जोरात कामाला लागते. पोथ्या पुराणे, साहित्य, महाकाव्ये, भाकड कथा घेऊन घरोघरी-दारोदारी फिरून कुप्रबोधनाची लाट निर्माण करतात. आधीच्या महापुरूषाने निर्माण केलेले क्रांतीचे बुरूज नष्ट करतात किंवा विद्रूप करतात. 
मोदींचा चंद्रगुप्त नाही होऊ शकत. कारण आश्रय देऊ शकणार्याा क्रांतिकारी शक्ती आकलना-अभावी क्षीण आहेत आणी काही क्रांतीकारी शक्ती जातीच्या नावाने फितूर आहेत. अर्थात याला जबाबदार आजचा शूद्रअतिशूद्र बुद्धीमान वर्ग आहे, जो राजकीय जागृतीचा विकास सामाजिक-सांस्कृतिक संघर्षात करू शकलेला नाही. आजचा शूद्रअतिशूद्र बुद्धीमान वर्ग सर्वात जास्त कर्मकांडी झालेला आहे. 
बुद्धीमान वर्गाचं पहिलं आणी शेवटचं काम हेच असतं की त्याने सांस्कृतिक संघर्षातील शस्त्रे विकसित करायची असतात. आपल्या महापुरूषाने जर आपल्याला ‘तलवार’ दिलेली असेल तर तिचा बंदुकीत विकास करता आला पाहिजे. आपल्या महापुरूषाने वर्णव्यवस्था नष्ट करणारे ‘धम्म-तत्वज्ञान’ दिले असेल तर त्याचा विकास जातीअंत करणार्याथ “नव्या’’ तत्वज्ञानात करता आला पाहिजे. पण नाही. सामान्य जनता कर्मकांड म्हणून जयंती-पुण्यतीथी साजरी करते आणी हे बुद्धीमान तेथे भाषण ठोकून मान व धन कमवितात. ब्राह्मणांना शिव्या देऊन, देवदेवतांची नकारात्मक टिंगल-टवाळी करून भरपूर टाळ्या मिळतात व भरघोस मानधनही मिळते. दिशा बदल करण्याची जबाबदारीच विसरलो आम्ही. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो.
1984 ते 1990 च्या काळात मंडल आयोगासाठीच्या जनजागृतीतून ओबीसींमध्ये राजकीय जागृती मोठ्या प्रमाणात झाली. अब्राह्मणी छावणीकडून मंडल आयोगाची अमलबजावणी सुरू करून युद्धाची घोषणा केव्हाही होऊ शकते, याची खात्री ब्राह्मणी छावणीला झालेली होती. मग या युद्धात शह देण्यासाठी ब्राह्मणी छावणीने सांस्कृतिक संघर्षाची गर्जना केली. मंडलचे शूद्रास्त्र बाहेर काढताच ब्राह्मणी छावणीने राम नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले. रामाचे हत्यार या सांस्कृतिक युद्धातील ब्रह्मास्त्र होते. त्या काळात कॉ. शरद् पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे “सीता शंबुक ताटिकेच्या स्मारकाची मोहिम’’ हाती घेतली होती. अयोध्येत एकीकडे रामंदिर व दुसरीकडे मस्जिद बांधून या दोघात सीता, शंबुक ताटिकेचं स्मारक उभे करावे, असा सम्यक तोडगा घेऊन आंदोलन केले. धूळ्यात सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यात आंदोलनाची रुपरेषा आखली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा आंदोलन सुरू झाले, तेव्हा सर्व दलित व कम्युनिस्ट पक्षांनी पळ काढला. कॉ. शरद पाटील यांचा सांस्कृतिक तोडगा देशपातळीवरील सर्व दलित, परोगामी व डाव्या पक्ष-संघटनांनी उचलून धरला असता तर रामंदिराचे आंदोलन कुठल्याकुठे गायब झाले असते. मुख्य म्हणजे या सांस्कृतिक संघर्षात ब्राह्मणी छावणीची पिछेहाट झाली असती व ओबीसींसकट वर्ग-जातीअंतक शक्ती मजबूत झाल्या असत्या. मात्र ऐन मोक्याच्या वेळी विजय उंबरठ्यावर असतांना आमचे सरदारच पळ काढतात व युद्ध हरतात.

ब्राह्मणी छावणी जेव्हा राम-कृष्णाच्या नावाने सांस्कृतिक युद्ध लादते, तेव्हा तेव्हा आमचे बहुजन बुद्धीमान लोक आकलनाभावी तारे तोडतात. रामायण व महाभारत काल्पनिक आहे, असे सांगून युद्धातून पळ काढतात. 2014 साली ओबीसी जागृतीची राजकिय लाट कॅश करण्यासाठी ब्राह्मणी छावणीने ओबीसी मोदींना प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार बनवीले. जसे चाणक्याने चंद्रगुप्ताला ‘राजा’ बनवीले. देशातील सर्व पुरोगामी, दलित व डाव्या पक्ष-संघटनांसाठी ही फार मोठी संधी होती. ओबीसी जनगणना, ओबीसींना 52 टक्के रिझर्वेशन व ओबीसी कर्मचार्यांमना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन, ओबीसींना सरकारी तिजोरीतून 52 टक्के हिस्सा यासारखे प्रश्‍न घेऊन देशपातळीवर आंदोलन केले असते तर चंद्रगुप्तासारखे मोदीनेही निश्‍चितच ब्राह्मणी छावणीविरोधात बंड केले असते. चंद्रगुप्ताला जैन धर्माचा, अशोकाला बौद्ध धम्माचा, ज्ञानेश्‍वराला नाथ धर्माचा, शिवाजींना शाक्त धर्माचा आधार मिळाला म्हणून ते ब्राह्मणी छावणी विरोधात विद्रोह करू शकलेत. याच कारणामुळे चंद्रगुप्ताचा ‘मोदी’ झाला नाही. मोदिंना असा कोणताही आधार क्रांतिकारी म्हणविणार्याा पक्ष-संघटनांनी पूरवला नाही, त्यामुळे मोदींचा ‘चंद्रगुप्त’ नाही होऊ शकला. परिणामी ब्राह्मणी छावणी अधिकाधिक मजबूत होत चाललेली आहे. पूर्ण पेशवाई कडून सर्वंकष पेशवाईकडे तिची वाटचाल जोरात सुरू आहे, आणी आम्ही आपसात एकमेकांचे ताट हिसकावण्यात मश्गुल आहोत. 
------- प्रा. श्रावण देवरे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget