Breaking News

होमगार्डचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : एएसपी डोईफोडे


बुलडाणा,(प्रतिनिधी): कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड नेहमीच तत्परतेने कार्य करतात. त्यांचे कार्य पोलीस व समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक संदीप डोईफोडे यांनी केले. येथील होमगार्ड जिल्हा समादेशक कार्यालयात काल 30 ऑक्टोबर रोजी उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम, संघटनेतून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेल्यांचा सत्कार व गणेशोत्सवात स्वयंसेवक म्हणून पोलीस बंदोबस्तात मदत करणार्‍या होमगार्ड जवानांचा गौरव कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. 

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डोईफोडे म्हणाले की, होमगार्डचे कार्य उल्लेखनीय आहे. तुमच्या काही व्यथा आहेत, पण त्या बाजूला ठेवून तुम्ही नेहमी अडचणीच्या वेळी समाजाला मदत करत आला आहात. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवा मध्ये देखील पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही बंदोबस्तात केलेली मदत गौरवास्पद असल्याचेही डोईफोडे म्हणाले. यावेळी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणारे मेहकर पथकाचे कंपनी कमांडर एस. सी. पवार, चिखलीचे समादेशक अधिकारी डी.एन.वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गणेशोत्सव काळात पोलिसांना बंदोबस्तात मदत करणार्‍या होमगार्ड जवानांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समादेशक कार्यालयातील सामग्री प्रबंधक शेळके, प्रशासनिक अधिकारी दसनूरकर यांनी परिश्रम घेतले.