Breaking News

बुलडाणा अर्बन सायकल मॅरॅथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न


बुलडाणा,(प्रतिनिधी): ‘पर्यावरण बचाव हा संदेश देण्यासाठी बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांचे मार्गदर्शनाखाली 1 नोव्हेंबर रोजी भव्य सायकल मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी सहकार विद्या मंदिर बुलडाणा ते केळवद व परत केळवद ते सहकार विद्या मंदिर असे 20 कि.मी. चे अंतर निश्‍चित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत सांगली, परभणी, वाशिम, अमरावती, अकोला व बुलडाणा यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातुन विविध सायकलपटूनी सहभाग घेतला. 

सकाळी 7.10 मिनीटांनी डॉ. सुकेश झंवर यांनी हिरवी झेंडी देवुन स्पर्धेची सुरुवात केली. आणि सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली. केवळ 27 मिनीटात हे अंतर लिलया पार करुन सांगलीच्या दिलीप माने यांनी प्रथम क्रमांक पटकविला तर सांगलीचेच राम जाधव यांनी केवळ 30 मिनीट घेवुन द्वितीय क्रमांक आपल्या नावे केला. तृतीय क्रमांक मिथुन जाधव वाशिम व शेख हुलूस परभणी यांना विभागुण देण्यात आला. बुलडाण्यातील प्रसिध्द सायकलपटू संजय मयुरे, डॉ.योगेश गोडे, सि.ए.बी.सचिन वैद्य, अ‍ॅड.राजेश लहाने, डॉ.जयसिंग मेहेर, डॉ. महेश बाहेकर, डॉ.शोन चिंचोले, डॉ.राजेश जतकर, डॉ. पिंपरकर यांचा स्पर्धेतील सहभाग हा आकर्षणाचा विषय ठरला. सदर स्पर्धेत 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बक्षीस वितरण समारंभात डॉ. सुकेशजी झंवर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक व सन्मानपत्र व प्रथम विजेत्यास रु.11000, द्वितीय विजेत्यास रु.8000, व दोन्ही तृतीय विजेत्या स्पर्धकांना रु.6000 रोख देवुन गौरविण्यात आले. समारोपीय भाषणात बोलतांना संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व विषद करुन सायकल चालविणे आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे याचे विवेचन केले. यावेळी मंचावर नारायण व्यास, सायकलपटू अलका गिरे, व्ही.एम.स्पोर्टसचे संचालक शेटे व डॉ.जयसिंग मेहेर उपस्थित होते.