Breaking News

... याबाबत कुठे माशी शिंकली? खटावला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळल्याने उदयनराजे संतप्त


सातारा (प्रतिनिधी) : शासनाने जाहिर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये कायम बारमाही दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्याचा समावेश का केला नाही याची माहीती उघड झाली पाहीजे, असा कोणता बदल किवा चमत्कार झाला आहे की त्यामुळे खटाव तालुक्याला दुष्काळातुन वगळले आहे. असा संतप्त सवाल करुन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. प्रशासनाचे काम म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा तर्‍हेचे आहे, खटाव तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यास व त्यानुसार जरुर त्या उपाययोजना राबविणेकरीता राज्याचे मुंख्य मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला वस्तुस्थिती पटवून देवू. खटाव तालुक्यातील जनतेने भाकरी आणि खर्डा खावून, काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा उत्स्फुर्तपणे घेतलेल्या निर्णयास आमचा सक्रीय पाठींबा आहे, असे मत व्यक्त केले.

खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, कायम दुष्काळी भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्याला उभ्या महाराष्ट्रात ओळखले जाते. सातारा जिल्हा एका बाजुला अतिवृष्टीचा आणि एका बाजूला अवर्षण अशी स्थिती सातारा जिल्ह्याची आहे. तसेच गेल्या काही वर्षात जलसंधारणाची कामे झाली असली तरी पिक पाण्याची आणेवारी पाहील्यास, खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त आणि अवर्षणग्रस्तच आहे. खटाव तालुक्याची पिक आणेवारीमध्ये फार काहीही फरक पडलेला नाही. तरी सुध्दा शासनाने खटाव तालुक्याला दुष्काळी गावांच्या यादीतून वगळले असल्याने आश्चर्य वाटते. याकामी शासकीय अधिकार्‍यांनी टेबलमेड अहवाल तयार केला आहे का? प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल तयार केला आहे. हे तमाम जनतेसमोर आले पाहीजे. नेमकी माशी कुठे शिंकली ते शोधले पाहीजे. अशा पध्दतीने खटाव तालुक्यावर अन्याय होवू दिला जाणार नाही.
खटाव वासियांनी एकजुटीने, खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत होणेसाठी संघटीत लढा उभारला आहे. यामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून, खटाव तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द खटाववासियांच्या बरोबर आम्ही राहणार आहे. काळी दिवाळी आंदोलनाला आमचा सक्रीय जाहिर पाठींबा राहील. तसेच येत्या काही दिवसात खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त गावांमध्ये होण्यासाठी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना वस्तूस्थिती विशद करुन मार्ग काढला जाईल, असेही भोसले यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.