Breaking News

जन्माला आलो हीच आपली सर्वात मोठी पात्रता : संदीप माकोडे


बुलडाणा,(प्रतिनिधी): स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी गरीब आहे. मी विशिष्ट जाती, धर्मात जन्माला आलो असे समजून स्वतःला कधीच कमी लेखू नका. आपण मानव जातीमध्ये जन्माला आलो हीच सर्वात मोठी पात्रता तुमच्या जवळ आहे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी आज यशस्वी अधिकारी झालेले दिसून येत आहेत. केवळ परिस्थितीला दोष न देता व रडत न बसता ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन न. प. मुख्याधिकारी संदीप माकोडे यांनी केले. मी अधिकारी होणारच अभियान व्याख्यानमाले अंतर्गत शहरासह ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यासाठी दि रॅशनल अ‍ॅकॅडमी मध्ये मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि रॅशनल अकॅडमी संचालक तथा मी अधिकारी होणारच अभियान व्याख्यानमालेचे मुख्य प्रवर्तक प्रा. राहुल हिवाळे हे होते. पुढे बोलताना माकोडे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा ही एक चालून आलेली महत्त्वाची संधीच असते. ही संधी पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात येत नाही. आजचा दिवस, आजची वेळ पुन्हा कधीच येत नसते. याची जाणीव ठेवा. त्यामुळे या परीक्षेमध्ये जमले नाही तर पुढची परीक्षा देईल, असा आशावाद करत बसू नका. आलेली परीक्षा हीच आपली अंतिम परीक्षा आहे, असे समजून संधीचे सोने करा. एकदा तुमच्या हातून एखादी परीक्षा पास होण्याची संधी सुटून गेली तर ती संधी परत येत नाही, याची जाणीव ठेवून अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही चिरंतन चालणारी प्रक्रिया असून यात यथोचित यश मिळवायचे असल्यास अभ्यासाची योग्य रणनीती नुसार मेहनत घ्यावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षा पास होणे अवघड नसून ती ठराविक चौकटीत राहून अभ्यास केला तर यश हमखास प्राप्त होते. या साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळा पासून मार्गदर्शन घेऊन त्यानुसार अभ्यासक्रम, मागील प्रश्‍नपत्रिका, सराव प्रश्‍नपत्रिका, योग्य पुस्तकांची निवड, वेळेचे व्यवस्थापन, योग्य मार्गदर्शक मान्यवरांची निवड, शासनाच्या वतीने प्रकाशित केल्या जाणार्‍या लोकराज्य, योजना, प्रेस इन्फर्मेशन ब्युरो इत्यादी संदर्भ नियमित वाचन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.