Breaking News

गणेश कृषि सेवा केंद्राने खाल्ले खत ; संजय फाटक यांच्या माहिती अधिकारामुळे प्रकार उघडकिसबीड, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील गणेश कृषि सेवा केंद्राने कंपन्यांसोबत संगनमत करुन खताचे अनुदान लाटल्याचा प्रकार माहिती अधिकाराच्या माहितीतून चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या बारा मिनिटात दोन क्विंटल खताची विक्री झाल्याचे दाखविण्यात आले असुन दुकान मालकाने पत्नी आणि मुलीच्याच नावे खत खरेदी केल्याच्या ई-पॉस पावत्या दाखवल्या आहेत. काही भुमिहिनांच्या नावेही खत खरेदी केल्याचे पावत्यावरुन स्पष्ट होत असल्याची माहिती तेथीलच संजय हरिभाऊ फाटक यांनी दिली आहे. माहिती अधिकारामुळे हा प्रकार उघडकीस आला असुन गणेश कृषि सेवा केंद्रासह संबंधित खत कंपन्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी संजय फाटक यांनी केली आहे.

केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथील गणेश सखाहरी फाटक यांच्या मालकीच्या गणेश कृषि सेवा केंद्रातून झालेल्या खताच्या विक्रीची आणि त्याच्याशी संबंधित अनुदानाची माहिती संजय हरिभाऊ फाटक यांनी माहिती अधिकारातून मागवली होती. त्यांनी दाखल केलेला माहिती अधिकाराच्या अर्जाकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय फाटक हे अपिलात गेले होते. त्यानंतर गणेश कृषि सेवा केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे फाटक यांनी सांगितले. गणेश कृषि सेवा केंद्र आणि आरसीएफ, झुआरी गोवा, परादिप फॉस्पेट लि., गुजरात स्टेट फर्टीलायझर्स केमिकल लि. या कंपन्यांनी संगनमत करुन शासनाकडून खतासाठी मिळणारे अनुदान हडप केले आहे. खत खरेदी केल्याचे दाखविण्यासाठी कृषि सेवा केंद्राचे गणेश फाटक यांनी ई-पॉस मशिनला त्यांच्या पत्नीसह मुलगी आणि सुनेचेही नाव बिलामध्ये दाखवले आहे. माहिती अधिकारात माहिती मागवण्यात आल्याने कृषि सेवा केंद्राचे मालक गणेश फाटक यांनी १ ऑक्टोबर २०१८ या एकाच दिवशी ९.२२ मिनिटे ते ९.३४ मिनिटापर्यंत तब्बल दोन क्विंटल खत खरेदी केल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे त्याच बिलात त्यांच्या पत्नीच्या नावे ५० किलो, सुनेच्या नावे ५० किलो आणि माहेरी आलेल्या मुलीच्या नावे ५० किलो असे खत खरेदी केल्याचे ई-पॉसला नोंद केली आहे. एवढेच नव्हे तर गोकुळ नारायण बोराडे, धनंजय गोकुळ बोराडे, गणेश सुरेश रोकडे या भुमिहिनांच्या आणि अमरनाथ विजय बोराडे, मनेश भारत डोरले, मनोज बबन गव्हाणे या अल्पभूधारकांच्या नावेही खत खरेदी केल्याच्या नोंदी ई-पॉस मशिनला आहेत. या प्रकारामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली असुन गणेश कृषि सेवा केंद्रासह आरसीएफ, झुआरी गोवा, परादिप फॉस्पेट लि., गुजरात स्टेट फर्टीलायझर्स केमिकल लि. यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणीही संजय हरिभाऊ फाटक यांनी पत्रकातून केली आहे.