Breaking News

विद्यार्थ्यांनी घेतलीफटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ रायपूर येथील जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांचा संकल्प


बुलडाणा,(प्रतिनिधी): रायपूर येथील यश गवते याचा तोंडात फटाका फुटल्याने मृत्यू झाल्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. या दु:खद घटनेने या परिसरातील जिजाऊ ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांचे मन गहिवरले असून, त्यांनी आज प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत फटाके न फोडण्याची शपथ शाळेत घेतली. तर यशच्या नावाने एक वृक्षही शाळेत लावला आहे. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलडाणाद्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथे आज यश गवतेला श्रद्धांजली वाहण्यात आली. 

यश हा संजय उत्तम गवते राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था रायपूर येथील कर्मचारी यांचा मुलगा होता. 30 ऑक्टोबर रोजी अचानक सुतळी बॉम्ब तोंडातच फुटला व यातच यशचा मृत्यू झाला होता. यशचा मृत्यू फटाक्यामुळे झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिजाऊ ज्ञानमंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची व प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याची शपथ घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्या भाऊसाहेब शेळके यांनी जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे समाजापुढे एक आदर्शच असल्याचे सांगितले. हा निर्णय पर्यावरण हिताचा असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाऊसाहेबांच्या हस्ते यशच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्यात आली. यशच्या नावाने वृक्षारोपण करून शाळेच्या या उपक्रमाचा बोध घेण्याचे आवाहनही भाऊसाहेबांनी केले. या उपक्रमाला संस्थेचे समन्वयक गोपालसिंग राजपूत, किशोर सिरसाट यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुसारी यांनी केले, तर ठाकूर यांनी आभार मानले.