मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपचा सफाया


नवी दिल्लीः राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेशमधुनही भाजपसाठी वाईट बातमी आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला झटका बसू शकतो. राज्याच्या गुप्तचर खात्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर खात्याने 30 ऑक्टोंबरला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे आपला गोपनीय अहवाल पाठविला आहे. 

मध्य प्रदेश विधानसभेच्या जागांची संख्या 230 आहे. मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसला 128 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 92 जागांवर समाधान मानावे लागेल, असे या अहवालात म्हटले आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला सहा तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला तीन जागा मिळतील, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटपावरून गोंधळ सुरू असताना मतदारांचा मात्र काँग्रेसकडे कल असल्याचे दिसते. 

मध्य प्रदेशमध्ये मागच्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. राज्यातल्या बुकींनी या वेळीसुद्धा भाजपच जिंकेल, असा अंदाज वर्तवला आहे; पण गुप्तचर खात्याचा अहवाल काही दुसरेच सांगत आहे. टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षण चाचणीचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात जनतेमध्ये नाराजी असून तिथे सत्तापालट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसला 110 ते 120 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला 70 ते 80 जागा मिळू शकतात. एकूण 67 विधानसभा मतदारसंघात ही चाचणी करण्यात आली. काँग्रेसला 43.5 टक्के, भाजपला 40.37 टक्के आणि अन्य पक्षांना 13.55 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. राजस्थानात काँग्रेसबरोबर आघाडीस नकार देणार्‍या बसपला 2.88 टक्के मतांसह 1 ते 3 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकून घवघवीत यश मिळवले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget