Breaking News

नगरपरिषदेच्या तांत्रिक सल्लागाराच्या बदलीची मागणी



पाथर्डी/प्रतिनिधी
पाथर्डी नगरपरिषदेने विविध विकासकामांच्या शासन दरबारी पाठपुराव्यासाठी नियुक्त केलेल्या तांत्रिक सल्लागारांच्या अविश्‍वासार्ह कार्यपद्धती वर नाराजी व्यक्त करत त्यांना हटवण्यासंबंधी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यासाठी तसेच विचारविनिमय व्हावा अशा आशयाचे निवेदन नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना दिले आहे.


आगामी काळात शहरामध्ये हरित पट्टा विकास, खुले नाट्यगृह सुशोभीकरण, पाण्याची टाकी, जॉगिंग ट्रॅक, पाथर्डी प्रादेशिक पाणी योजना, ग्रामदैवत रामगिरबाबा टेकडी पुनर्निर्माण, नवीन प्रशासकीय इमारत इत्यादी कोट्यवधी रुपयांचा निधीची विकासकामे प्रस्तावित आहेत. ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रके तयार करणे, पाठपुरावा करून आवश्यक त्या मंजुरी मिळवणे याकामी सदर संस्था दिरंगाई करत आहेत. तसेच नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांबाबत मनमानी करत आहेत.


असा आरोप केला जात आहे. या कुचराईमुळे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हा कोट्यवधी रुपयांचा अखर्चित निधी इतर कामांसाठी शासन वळवू शकते. याशिवाय सदर संस्थांनी या अगोदर केलेल्या कामांची देयके देण्यास नगरपरिषद हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे असमर्थ आहे. तेव्हा विकासाचा अनुशेष भरून निघणार कसा हा प्रश्‍न लोकप्रतिनिधींना भेडसावत आहे. यावेळी प्रशांत शेळके, बादल पलाटे, दिपालीताई बंग, संगीताताई गटाणी, दुर्गाताई पलाटे आदी उपस्थित होते.