Breaking News

चाकू, तलवारी बाळगणाार्‍या गुंडांसोबत नाही तर समाजसेवा करणार्‍या गुंड यांच्यासोबत आमची मैत्री- अजित पवार


कर्जत/प्रतिनिधी
आण्णांनी माणसं जोडून समाज उभा केला. हीच खरी त्यांची ताकद आहे. आमचे संबंध सुरे, तलवारी वापरणार्‍या गुंडाबरोबर नसून सरपंचापासून विविध पदे सांभाळत शिक्षण संस्थेद्वारे समाजाची सेवा करणार्‍या गुंडाबरोबर आहेत. या शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बापूसाहेब गुंड यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. कर्जत येथे कुळधरणचे सुपुत्र बापूसाहेब कोंडीबा गुंड यांच्या जीवन गौरव समारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

राज्य सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, हे सरकार फक्त शब्दाचा खेळ करत लोकांच्या भावनेशी खेळत आहे. भाजपाला सत्तेची मस्ती व धुंदी चढली असून सध्या महागाईचा आगडोंब उसळला असताना लाखाचा पोशिंदा मात्र उपाशी आहे. रात्र वैर्‍याची आहे, जागे रहा असे आवाहन पवार यांनी केले. दुष्काळी परिस्थितीत शासनाने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते बापूसाहेब गुंड यांचा गौरव तसेच त्यांच्या जीवनावर आधारित स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले.

माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड यांनी पक्षाने सातत्याने दिलेल्या बहुमानाबद्दल पवार यांचे आभार मानले. अंबालीका कारखान्यामुळे तालुक्याला जीवदान मिळाले असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री कोट्यवधी रुपयांच्या कामाची उद्घाटने करण्यात दंग असून नवीन रस्ते मात्र होताना दिसत नाहीत. किमान खड्डे भिजण्याचे तरी काम त्यांनी करावे अशी मागणी मुंडे यांनी केली. तालुक्यातील जनतेची चूक नाही.आमच्या नेत्यामध्ये मेळ नाही. तुम्ही एक माणूस द्या.आम्ही त्याला निवडून देऊ असे म्हटल्यावर उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला.यावेळी आ.डॉ सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांची शुभेच्छापर भाषणे झाली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, डॉ. सुधीर तांबे,आशुतोष काळे, हर्षदा काकडे, विजयाताई अंबाडे, शिवाजीराव गाडे, विठ्ठल लंघे, राजेंद्र नागवडे, सोमनाथ धुत,राजेंद्र कोठारी, दत्ता वारे, मधुकर राळेभात, बाळासाहेब हराळ,ह.भ.प.प्रकाश महाराज जंजीरे, राजेंद्र गुंड,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, बाळासाहेब साळुंके,काकासाहेब तापकीर,अण्णासाहेब मोरे,स्मरणिकेचे संपादक सूर्यभान सुद्रिक, ज्योतीराम कदम,सतीश कळसकर,अनिल सुपेकर,ओंकार गुंड यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना बापूसाहेब गुंड यांनी आपणा सर्वांच्या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे म्हटले. जनतेच्या प्रेमामुळे सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. त्रिमूर्ती उद्योग समुहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड यांनी आभार मानले. प्रास्ताविक अ‍ॅड. बापूसाहेब चव्हाण यांनी केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मान्यवरांचे स्वागत केले.