Breaking News

दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍यांचे उपोषण


जळगाव जामोद,(प्रतिनिधी): यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पावसामुळे रब्बी हंगाम सुद्धा धोक्यात सापडला आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. तसेच तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जळगाव जामोद ते सोनाळा रोडवर आदर्श ग्राम चालठाणा उसरा चौफुलीवर 6 नोव्हेंबर दिवाळीच्या पूर्व संध्ये पासून उपोषणास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त करीत असताना त्यात जळगाव जामोद तालुक्याचा समावेश नसणे हा येथील शेतकर्‍यांवर अन्याय आहे.

तरी जळगाव जामोद तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी येथील दुष्काळाच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा फायदा होण्यासाठी व त्यांना उदर निर्वाहासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीमागे राहणे गरजेचे आहे. यासाठी दुष्काळी यादीत जळगाव जामोद तालुक्याचा समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करीत तत्काळ दुष्काळाच्या यादीत जळगाव जामोद तालुक्याचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी दिवाळीच्या पूर्व संध्येपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात रमेश बाणाईत, शालिग्राम भगत, सुनील गवई, अनंता बकाल, रामेश्‍वर केदार, समाधान भगत, पांडुरंग वानखडे, परमेश्‍वर राऊत, हरिभाऊ हागे, दिनकर राऊत, रमेश मिसाळ, रमेश ढगे, उमेश पाटील, श्रीराम मिसाळ, शिवचरण पाटील, मारोती धुर्डे व वसंता केदार यांनी सहभाग घेतला आहे.