दखल : भाजप पुन्हा एकदा नापास

गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या पदरात अपयश येत गेलं. लोकसभेत बहुमत असलेला पक्ष आता अल्पमतात गेला आहे. विरोधी पक्ष फक्त पोटनिवडणुका जिंकण्यासाठीआहेत, अशी टीका भलेही भाजप करीत असेल; परंतु प्रत्येक निवडणुकीत या पक्षाचं बळ सातत्यानं घटतं आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही, असं थोडंच आहे. आताच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात आहेत. कर्नाटकमध्ये पाच जाागांसाठी निवडणूक होती. त्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या असल्या, तरी त्याचा परिणाम मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या राज्यांतील निवडणुकीवर होऊ शकतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसच्या सरकारवरचा अविश्‍वास असं स्वरुप भाजपनं या निवडणुकीला दिलं होतं. प्रत्यक्षात झालं उलटंच. भाजपची प्रत्येक खेळी इथं अपयशी ठरली. काँग्रेसच्या आमदारांना नादी लावून, काहींना अन्याय झाल्याची भावना निर्माण करून पक्षाविरोधात भडकावण्याचा प्रयत्न भाजपनं करून पाहिला. धर्मनिरेपक्ष जनता दल व काँग्रेसमध्ये भांडणं लावण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यासारखे काही नेते ही सरकार पुढची डोकेदुःखी ठरत होती. कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या; परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली, की भाजपपुढं सत्तेतून बाहेर राहण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. त्यातही राहुल गांधी यांनी तातडीनं हालचाली करून दुय्यम भूमिका घेतली. पक्षाकडं जास्त जागा असूनही धर्मनिरपेक्ष जनता दलाकडं मुख्यमंत्रिपद देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. भाजपनं कर्नाटकाकडं दक्षिण दिग्विजयातलं महत्त्वाचं राज्य म्हणून पाहिलं; परंतु आता कर्नाटकातून लोकसभेला जास्त जागा मिळणं हे मृगजळच ठरण्याची शक्यता आहे. 
कर्नाटकमध्ये कुमार स्वामी यांच्या शपथविधीला तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, शरद पवार, अखिलेश यादव, मायावती,  सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह उपस्थित असलेल्या नेत्यांची मांदियाळी पाहिली, तर महाआघाडीची मुहूर्तमेढ तेथील निवडणुकीतच रोवली गेली. आता तर कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेलं अपयश पाहता पुढची लोकसभा निवडणूक भाजपला फार सोपी नाही, हे त्यातून ध्वनित होतं. कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीनं दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभेच्या तीनपैकी दोन जागा काँग्रेस-जेडीएसनं तर भाजपला शिमोगा या एकमेव लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला. विधानसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस-जेडीएस आघाडीनं जिंकल्या. या निवडणुकीचं वैशिष्टय म्हणजे काँग्रेस-जेडीएसनं चारही जागा मोठया मताधिक्क्यानं जिंकल्या आहेत. बल्लारीमध्ये काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा यांनी भाजपच्या जे.शांता यांच्यावर तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्यानं विजय मिळवला. 2004 पासून ही जागा भाजपाकडं होती. 14 वर्षांनंतर काँग्रेसनं ती मिळविली. सोनिया गांधीविरुद्ध सुषमा स्वराज यांच्यातील लढत तिथं लक्षणीय झाली होती. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे खाणसम्राट यांच्यांशी असलेले संबंध आणि स्वराज यांचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता त्यांचं भाजपत वर्चस्व होतं. येदियुरप्पा यांना त्याची मोठी किमंत मोजावी लागली होती. खाणसम्राट रेड्डी बंधूंचे विश्‍वासू सहकारी श्रीरामुलू यांची बल्लारीवरील पकड  संपत चालल्याचं हे लक्षण आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपला इथं मोठा फटका बसला होता. आता लोकसभेची जागाही हातून गेली. 
 मांडया लोकसभा मतदारसंघातून शिवराम गौडा यांनी सोपा विजय मिळवला. काँग्रेस-जेडीएसचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. सिद्धारामय्या यांनी दोन लाखापेक्षा जास्त मतं मिळवली. वोक्कालिगांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात इतकी मते मिळवणं ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. हा समाज भाजपचा पाठिराखा आहे. तरीही तिथं काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलानं विजय मिळविला. टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून घातला जात असलेला वाद, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या, त्यानंतर भाजपच्या एका खासदारानं काढलेले उद्गार, अनंतकुमार या केंद्रीय मंत्र्यांनी दलितांना दिलेली गाडीखालच्या कुत्र्याची उपमा हे सर्व पाहता त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला नसेल, तरच नवल.
 शिवामोगामध्ये येदियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय.राघवेंद्र यांनी जागा कायम राखली. प्रदेशाध्यक्ष बी.एस.येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळं इथं निवडणूक झाली. त्यांनी जेडीएस उमेदवार मधु बंगरप्पा यांचा 50 हजार मतांनी पराभव केला. जमाखांदी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आनंद एस नयामगौडा 39 हजार 480 मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. त्यांना 96 हजार 968 मतं मिळाली, तर भाजप उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांना 57 हजार 492 मतं मिळाली. रामानगरम विधानसभा मतदारसंघातून जे़डीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी 1 लाख 9 हजार 137 मतांनी विजयी झाल्या आहेत. अनित कुमारस्वामी यांना 1 लाख 25 हजार 43 मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराला फक्त 15 हजार 906 मतं मिळाली. अनिता मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच भाजपला कर्नाटकमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला आहे. 
कर्नाटकातील बेल्लारी, शिमोगा आणि मांड्या या लोकसभा मतदारसंघापैकी बेल्लारी आणि शिमोगा लोकसभा सीट भाजपच्या ताब्यात होती, तर मांड्याची जागा  जेडीएसकडं होती. गेल्या चार वर्षात आतापर्यंत लोकसभेच्या 30 जागांवर पोटनिवडणुका झाल्या आहेत. या 30 पैकी 16 जागा भाजपच्या ताब्यात होत्या. त्यातील केवळ सहा जागांवर भाजपला विजय मिळविता आला असून दहा जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळं 2014 मध्ये 282 जागांवर विजय मिळविणार्‍या भाजपची संख्या घटून 272 इतकी झाली आहे. सिद्धरामय्या यांनी हा विजय म्हणजे दिवाळीची भेट असल्याचं म्हटलं आहे. जनतेनं भाजपला नाकारलं आहे, असं ते म्हणाले. ज्यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला होता; त्यांना उत्तर मिळालं आहे. हा विजय काँग्रेस -जेडी (एस) साठी दिवाळीची भेट आहे. आगामी लोकसभेत काँग्रेस 20 हून अधिक जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 
या निवडणुकांकडे सत्ताधारी काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलानं पोटनिवडणुकीत मिळविलेला विजय ही पहिली पायरी आहे. त्यानंतर आता 28 लोकसभेच्या जागा जिंकण्याचं आमचं लक्ष आहे. काँग्रेसच्या मदतीने आम्ही या सर्व जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.


 भाजपनं जेडीएस-काँग्रेसच्या युतीला अपिवत्र मैत्री संबोधलं होतं; मात्र हा समजही आता निरर्थक असल्याचं सिद्ध झालं आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या विजयाची भारतीय संघाच्या कसोटी मालिका विजयाबरोबर तुलना केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो, त्याच धर्तीवर कर्नाटकात काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीने 4-1 कामगिरी करुन दाखवली आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget