Breaking News

शिवसेनेतून लवंगी फटाकडे जाऊन अ‍ॅटोमबॉम्ब येत आहेत - भगवान फुलसौंदर


नगर - शिवसेनेतून लवंगी फटाकडे जात आहेत आणि अ‍ॅटोमबॉम्ब येत आहेत. त्यामुळे कोणीही कुठेही गेले तरीही शिवसेनेला कधीच फरक पडला नाही आणि पडणारही नाही, असे मत माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केले. 

नगर शहरातील व्यापारी तसेच जैन ओसवाल पतसंस्थेचे संचालक शैलेश पोपटलाल गांधी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शशिकांत गाडे, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक दत्ता कावरे, मेहूल भंडारी, ऋषभ भंडारी, संजय बोरा, नितीन चंगेडीया, संतोष गांधी, लंकेश हरबा, घनशाम घोलप, अशोक दहिफळे, रियाज सय्यद, गिरीश जाधव, संतोष गेनाप्पा, सुरेश तिवारीहे उपस्थित होते. 

याप्रसंगी शैलेश गांधी म्हणाले, आतापर्यंत सामाजिक कार्य करून व्यापा-यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्न केले व व्यापा-यांच्या सोबत राहूनच मी कायम सामाजिक काम करीत आलो. शिवसेना हा जनसामान्यांचा पक्ष असून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम हेच शिवसेनेचे धोरण आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारी व सर्वसामान्यांना पदावर विराजमान करुन मान देणारी व स्वत:पेक्षा दुस-याला पदावर बसविणारे नगर शहरात एकमेव नेता असेल तर ते शिवसेना उपनेते अनिल राठोड. शिवसेनेच्या माध्यमातून व्यापा-यांच्या प्रश्‍नांसाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍न प्रभाग क्र.14 मधील माता भगिनींचे प्रश्‍न व मुलींसोबत होणारी छेडछाड व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी काम करणार आहे.