Breaking News

लोक कलावंतांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘अन्नत्याग’ आंदोलन


बुलडाणा,(प्रतिनिधी): लोक कलावंतांनी अर्ज करूनही मानधन समिती गठीत नसल्याचे कारण देत कलावंतांना मानधन सुरू करण्यात येत नाही. त्यामुळे तत्काळ वयोवृद्ध मानधन समिती गठीत करण्यात यावी. या मागणीसाठी युवा स्वाभिमानसह जिल्ह्यातील लोक कलावंतांनी गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजने गात अन्न-त्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवा स्वाभिमान पार्टीचे ईश्‍वरसिंग चंदेल यांनी केले. 

या वेळी लोक कलावंतांनी विविध भजने गात आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार जिल्ह्यातील वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या अंमलबजावणीतील अभावामुळे, मानधन समिती गठीत नसल्यामुळे कलावंतांवर अन्याय होत आहे. त्यातच मागील चार ते पाच वर्षांपासून मानधन समिती अस्तित्वात नसल्यामुळे कलावंतांना मानधन सुरू करण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत. एका वर्षात 60 कलावंतांची नेमणूक केली जात असते. परंतु मानधन समिती गठीत नसल्यामुळे 300 कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत मानधन समिती गठीत करा, अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्‍वरसिंग चंदेल, शाकीर, हरिदास खांडेभराड, दीपक महाराज सावळे, विलास सुरुशे, शिवाजी खराटे, अमोल शेळके, निखिल काळे, यश शेळके, हरी जाधव, राम सुरुशे, दीपक राजावत, तौफिक शेख यांनी केली.