Breaking News

जागतिक दबावामुळे संसदेचे निलंबन मागेकोलंबो ः श्रीलंकेतील राजकीय संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका राष्ट्रपतींवर जगभरातून दबाव वाढत आहे. जागतिक दबावामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी संसदेचे निलंबन मागे घेतले. राजकीय संघर्ष थांबविण्यासाठी त्यांनी सोमवारी संसद सदस्यांची बैठक बोलावली आहे. संसदेचे अधिवेशन पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

सिरीसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे सरकार बरखास्त करत माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान बनविले. तसेच त्यांनी संसद 16 नोव्हेंबरपर्यंत निलंबित केली होती; मात्र आता निलंबन मागे घेण्यात आले आहे. सिरीसेना यांच्याविरोधात श्रीलंकेत निदर्शने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींनी सौम्य भूमिका घेत संसदेचे निलंबन मागे घेतले आहे.

दरम्यान, संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाच्या खूर्चीवर बसू न देण्याचा इशारा दिला आहे. श्रीलंकेच्या 225 सदस्यांच्या संसदेत बहूमत सिद्ध करण्यासाठी 113 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. नवनियुक्त पंतप्रधान राजपक्षे यांना आतापर्यंत 101 सदस्यांनी समर्थन दिले आहे. विक्रमसिंघे यांच्या पक्षातील पाच सदस्यांना आपल्याकडे ओढून घेण्यात राजपक्षे यांना यश आले आहे. मात्र, बहुमताचा आकडा पार करण्यासाठी अजून त्यांना 12 सदस्यांची गरज आहे. युनायटेड नॅशनल पार्टीचे विक्रमसिंघे यांच्याकडे 106 सदस्यांचे पाठबळ आहे. संसदेत तमिल नॅशन अलायन्सचे (टीएनए) 16 सदस्य आणि पीपल्स लिबरेशन फ्रंटचे सहा सदस्य आहेत.

श्रीलंकेत सत्ताबदल झाल्यानंतर गेल्या मंगळवारी विक्रमसिंघे यांच्या पक्षाने कोलंबोत जोरदार निदर्शने केली होती. त्यानंतर देशातील राजकीय संकट थांबविण्यासाठी निलंबन मागे घेतले आहे.