Breaking News

फलटणमध्ये आंदोलनकर्त्यांना अभ्यंगस्नान


फलटण (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गाळ्याची अन्यायकारक भाडे वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या विरोधात गाळेधारकांनी अधिकार गृहासमोर आज तेल, उटणे, साबण लावून पहिली आंघोळ केली. यावेळी ‘भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भन्नाट दिवाळी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

गेली दीड वर्षे झालं मार्केट कमिटीकडे लेखी व तोंडी होणारी भाडेवाढ रद्द करावी तसेच अनामत रकमेत वाढ करू नये अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत. सुविधा देण्यासाठी कोणतेही पाऊल मार्केट कमिटीकडून उचलले जात नाही. मात्र, पणन विभागाचे अधिकारी सांगत आहेत की आमचेकडून कोणत्याही प्रकारची लेखी सूचना नाहीत. सचिव शंकरराव सोनवलकर हे सभापती श्रीमंत रघुनाथराजे निंबाळकर व इतर संचालक यांच्या दबावाखाली ही भाडेवाढ करत असल्याचा आरोप संचालक सुशांत निंबाळकर यांनी केला आहे.

शुक्रवारी, दि. 2 नोव्हेंबर रोजी एक दिवस सर्व गाळे व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला होता. अन्यायग्रस्त ही भाडेवाढ रद्द करावी यासाठी काल (सोमवारी) चक्री उपोषण सुरू केले. आज दि. 6 रोजी ऐन दिवाळीत उपोषण ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी तेल, उटणे, साबण लावून पहिली आंघोळ अधिकार गृहासमोर केली. भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.