Breaking News

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धरणे आंदोलन


बुलडाणा,(प्रतिनिधी): संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नाफेडकडे बाकी असलेले चुकारे त्वरित द्यावे, शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, दिवसाचे भारनियमन बंद करून शेतकर्‍यांना 12 तास वीज पुरवठा करा, यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी केले होते. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बहुतांश शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान शासनाने राज्यातील 181 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, मेहकर, चिखली, जळगाव जामोद, देऊळगावराजा या पाच तालुक्यांना वगळले आहे. या सर्व तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करावा, नाफेडमार्फत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे त्वरित द्यावे, शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा, महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करावी, प्रत्येक क्षेत्रात युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या, या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ड. नाझेर काझी, संगीतराव भोंगळ, अ‍ॅड. साहेबराव सरदार, नरेश शेळके, अ‍ॅड. सुमित सरदार, नितीन शिंगणे, तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने, नाना कोकरे, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, अनिता शेळके, आशा पवार, लक्ष्मी शेळके, संदीप पाटील, मंगला वायाळ, नसीम सेठ, कदीर भाई, शंकर राजपूत, राजेंद्र नरोटे, नीलेश देठे, संदीप मेहेत्रे, अनिल वर्मा, सत्तार कुरेशी, बबलू कुरेशी, मंगेश बिडवे, राजू नागवे, शिवाजी पडोळ, सुरेश जाधव, प्रा. रिजवान खान, बबन सावळे, विठ्ठल किलबिले, अनिल रिंढे, महेश देवरे, विठ्ठल मोरे, रियाज खानसह राष्ट्रवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.