Breaking News

शिक्षण आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकित शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा शिक्षकांचे प्रश्‍न तातडीने सोडविण्याची शिक्षक परिषदेची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची नुकतीच शिक्षण आयुक्तांबरोबर पुणे येथे बैठक झाली. शिक्षकांचे विविध प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा चालू असून, गंभीर प्रश्‍न लवकरच सुटणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षकांच्या विविध प्रलंबीत प्रश्‍ना संदर्भात घेण्यात आलेली बैठक शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शिक्षकांचे विविध प्रश्‍नावर चर्चा होऊन सदर प्रश्‍न सोडविण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीसाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक गंगाधर मम्हाणे, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, बाबासाहेब काळे, भगवान साळुंखे, नाशिक विभाग अध्यक्ष सुनिल पंडित, कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार, नागपूर विभाग अध्यक्ष के.के. वाजपेयी, अमरावती विभाग अध्यक्ष राजकुमार बोनकिले, पुणे विभाग अध्यक्ष अर्जुन सावंत, पुणे विभाग कार्यवाह सोमनाथ राठोड, मराठवाडा विभाग अध्यक्ष नंदकिशोर झरीकर, मराठवाडा विभाग कार्यवाह सुरेश पठाडे, जितेंद्र पवार आदी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकित शाळा मान्यता, बोर्ड मान्यता व आरटीई मान्यता, संच मान्यता व आक्षेप, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शालार्थ आयडी, नियमित व थकित वेतन, जीपीएफ व डीसीपीएस, प्रशासन शालेय स्तर शिक्षण विभाग, प्रलंबित प्रकरणे, सेवानिवृत्ती, वेतन प्रकरण, वैयक्तिक मान्यता, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, सेवा पुस्तक, सेवाज्येष्ठता यादी, सातवा वेतन आयोग, शासन निर्णयाची अंमलबजावणी, दि.2 मे 2012 नंतरच्या नियुक्त्या व मान्यता, टिईटी व पवित्र प्रणाली, पाठ्यपुस्तकांचे वितरण, प्रशिक्षण, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी, पुनर्रचित अभ्यासक्रम, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, परीक्षक मानधनाबाबत तसेच परीक्षा व मूल्यमापन आदी विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सभेचे संचालन राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी केले.