Breaking News

बोंडअळीचे अनुदान होणार दिवाळीपूर्वी खात्यात जमाबुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील पहिल्या दोन टप्प्यातील बोंडअळी मुळे झालेल्या नुकसान भरपाई ची रक्कम काही शेतकर्‍यांना मिळाली असून, तिसर्‍या टप्प्यातील शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वी उर्वरित शेतकर्‍यांना तिसर्‍या टप्प्यातील अनुदानाची रक्कम द्यावी, या मागणीसाठी माजी आ. विजयराज शिंदे यांनी 30 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री ना. मदन येरावार यांची मुंबई येथे मंत्रालयातील मंत्री महोदयांच्या दालनात भेट घेतली व शेतकर्‍यांना बोंडअळीचे उर्वरित अनुदान तत्काळ जमा करण्याची आग्रही मागणी केली. 

यावेळी ही मागणी रास्त असल्याचे मान्य करत पालकमंत्री महोदयांनी तत्काळ जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे यांना दूरध्वनीवर संपर्क करून लाभ न मिळालेल्या पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात तत्काळ बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, असे निर्देश संबंधितांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तिसर्‍या टप्प्यातील रक्कम ची मागणी शासनाकडे केल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री महोदयांनी याबाबत पाठपुरावा करून शासनाकडून रक्कम तत्काळ मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे.