Breaking News

नगरविकास राज्यमंत्र्यांवर हायकोर्टाचे ताशेरे; उपनगराध्यक्षांसह नऊ नगसेवकांची अपात्रता रद्द; नगराध्यक्षांना धक्काबीडः बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह 9 नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी 18 मे रोजी कचराफेक प्रकरणी अपात्र केले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने नगरविकास राज्यमंत्र्यांचा तो आदेश रद्द ठरवला आहे. राज्यमंत्र्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या निर्णयामुळे काकू नाना विकास आघाडीला दिलासा मिळाला असून नगराध्यक्ष गटाला मोठा धक्का बसला आहे.

नगराध्यक्षांच्या दालनात कचराफेक प्रकरणी नगरविकास राज्यमंत्र्यांनी क्षीरसागर, गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, रमेश चव्हाण, प्रभाकर पोपले, सम्राट चव्हाण, युवराज जगताप, रणजित बनसोडे, डॉ. इद्रिस हाश्मी व इतरांना अपात्र केले होते. याप्रकरणी अ‍ॅड.सय्यद तौसिक यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगााद खंडपीठात धाव घेण्यात आली होती. नगरविकास राज्यमंत्र्यांनी बीड नगरपालिकेच्या दहा नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत जो निर्णय दिला, तो नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन न करता घाई गडबडीत घेतला असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने राज्यमंत्र्यांवर व प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले आहेत.


कचराफेक प्रकरणात 25 जानेवारी 2018 रोजी उच्च न्यायालयाने नगरविकास राज्यमंत्र्यांनी हे प्रकरण 23 एप्रिल 2018 पर्यंत निकाली काढावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश अपात्र करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिले नाहीत तसेच नगरसेवकांना अपात्र करण्याचे आदेश 18 मे 2018 रोजी पारित काढले. आदेशाची प्रत 19 मे 2018 रोजी शनिवारी सायंकाळी 7 वाजता फक्त फारुख अली पटेल या एका नगरसेवकालाच देण्यात आली. 20 मे 2018 रोजी रविवारची सार्वजनिक सुटी होती व 21 मे रोजी लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे मतदान होते. अशा परिस्थितीमध्ये आघाडीच्या वतीने 20 मे रोजी रविवारची सुटी असूनही उच्च न्यायालयामध्ये राज्यमंत्र्यांच्या आदेशाविरोधात दाद मागितली व या आदेशाला स्थगिती मिळवली.

उच्च न्यायालयाची रीट मिळाल्यापासून 50 दिवसांच्या आत हे प्रकरण राज्यमंत्र्यांसमोर नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देऊन व नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन करून पुन्हा निकाली काढण्याचे आदेश होते. 

काकाला दिलासा, पुतण्याला धक्का

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपासून नगराध्यक्ष काका विरोधात पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काकांच्या गटाला दिलासा मिळाला आहे.