मराठा आरक्षण हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय : आ. देसाई


पाटण (प्रतिनिधी) : मराठा समाजाला 16 टक्के दिलेले आरक्षण हा युती शासनाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे सकल मराठा समाजाला न्याय मिळाला असून मराठा समाजाला कायदयाच्या चौकटीत टिकेल आणि तेही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही असे आरक्षण युतीच्या शासनाने मिळवून दिले असून याचा आम्हास खुप आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार देसाई म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सकल मराठा समाजाला योग्य असे मराठा आरक्षण मिळावे, अशी समाजाची मागणी होती. त्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलने करण्यात आली, राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झालेनंतर कायदयाच्या चौकटीत टिकेल आणि इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का पोहचणार नाही असा कायदा विधीमंडळाच्या याच अधिवेशनात करण्यात येईल अशी जाहीर ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती, त्यानुसार आज 16 टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य मागसवर्ग आयोगाचे अहवालावरील कृती अहवाल (एटीआर) विधेयकाच्या माध्यमातून विधानसभेत मांडण्यात आला व तो एकमताने मंजुरही करण्यात आला. भाजप- शिवसेना युतीच्या शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला धोरणात्मक निर्णय हा ऐतिहासिक असा निर्णय आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतलेबद्दल मी माझे पाटण विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीने युतीच्या महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आणि विशेष असे आभार मानतो. या ऐतहासिक निर्णयामुळे सकल मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणांचा आणि नोकर्‍यांचा गंभीर असा प्रश्न आता सुटणार आहे. याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रियाही आमदार देसाईंनी व्यक्त केली आहे.


म्हसवडमध्ये जल्लोष 


म्हसवड : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्वपक्षीय मराठा समाजाने मोठा जल्लोष करून म्हसवड येथे आनंद व्यक्त केला.
मुंबई येथील राज्य अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा ठराव मांडला त्यास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, रासप, शेकापसह सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठींबा दिला. मराठा आरक्षण एकमताने मंजूर होताच म्हसवड येथील सर्व मराठा बांधव एकत्र आले. म्हसवड बसस्थानक व प्रमुख चौकात फटाके वाजवून; साखर वाटून मोठ्या जल्लोषात, घोषणा देऊन सर्वांनी आनंद व्यक्त केला. या निमित्ताने सर्वांनी श्री. सिद्धनाथाचे दर्शन घेतले व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी बाळासाहेब राजेमाने, जय राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, बाबासाहेब माने, आकाश माने, महादेव माने, डॉ. जयराज पवार, सुरेश काटकर, बापूसाहेब बाबर यांचेसह सर्व राजकीय पक्षातील अनेक मान्यवर मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget