Breaking News

लहूजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली डोंबारी समाजाने हक्काच्या दफनभूमीसाठी केलं अनोखं आंदोलन


श्रीगोंदा तालुकाप्रतिनिधी- श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथे सुमारे चाळीस वर्षापासून राहणाऱ्या डोंबारी समाजाच्या लोकांना दफनभूमीसाठी हक्काची सरकारी जागा मिळवावी यासाठी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा सचिव संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर पारंपारिक डोंबारी खेळ करून आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनामध्ये डोंबारी समाजाचे सुमारे दीडशे स्त्री-पुरुष सहभागी झाले. यावेळी डोंबारी समाजाचे अशोक चव्हाण, रामचंद्र चव्हाण, धर्मा पवार, लालू वाघ, दिलीप जाधव तसेच लहूजी शक्ती सेनेचे नवनाथ शिंदे, वसंत अवचिते, संदीप अवचिते, आबासाहेब बोरगे, आबा तोरडमल, राजाराम काळे, पप्पू अडगळे, बाबुराव खवले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिंगणी दुमाला येथे डोंबारी समाजाचे सुमारे १९ -२० कुटुंब सुमारे चाळीस वर्षापासून राहत आहेत. मात्र समाजात कोणी व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या दफन विधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मृत व्यक्तीची मोठी अहवेलना होत अडचण निर्माण होते. त्यामुळे मृत व्यक्तींना रीतीरिवाजानुसार दफन करता यावे यासाठी हिंगणी दुमाला गावातीलच महाराष्ट्र शासनाच्या नावे असणारी व डोंबारी समाजाच्या दृष्टींने सोयीची असणारी गट नं. २ मधील १० ते १५ गुंठे जागा दफनभूमीसाठी मिळावी तसेच डोंबारी कला सादर करणाऱ्या वृद्धांना तसेच समाजातील विधवा व अपंग व्यक्तींना शासकीय योजना मिळाव्यात. वृद्ध कलाकारांना कलाकार म्हणून मानधन सुरु करावे या मागण्यांसाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या डोंबारी समाजाच्या वतीने पारंपारिक खेळ, वाद्य, तारेवर चालणे, उड्या मारणे असे खेळ करून आंदोलन करण्यात आले.