पाणलोटाची कामे शास्त्रशुध्द पध्दतीने केल्यास दुष्काळावर मात शक्य : डॉ. सुधीर भोंगळे


भोसरे (प्रतिनिधी) : पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याच जागी जिरवणे व वाहून जाणार्‍या मातीला त्याच जागी अडवणे काळाची गरज बनली आहे. पाणलोटाचे हे कामे शास्त्रशुध्द पध्दतीने केले तर दुष्काळावर मात करणे शक्य होईल, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांनी केले.

खटाव येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिनिदिनी आयोजित केलेल्या व्याख्यानात ’दुष्काळावर करू मात’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रत्नमाला घाडगे होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप विधाते, भूजलतज्ज्ञ विलास भोसले, प्राचार्य रामचंद्र कोरडे, उपसरपंच कॅप्टन बबनराव घाडगे, जाखनगावचे उपसरपंच जितेंद्र शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणूण उपस्थित होते. 

डॉ. भोंगळे म्हणाले, प्रत्येक गावाने पाणलोटाचे काम लोकश्रमदानाच्या माध्यमातून हाती घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हे काम डोळे उघडे ठेऊन व शास्त्रशुध्दरितीने करणे गरजेचे आहे. नुसते जमिनीला खड्डे काढून, नाले उभे, आडवे घेतले म्हणजे पाणलोटचे काम होत नाही. पाण्याचे महत्व ओळखून घराघरात आता पाण्याचा ताळेबंद मांडता आला पाहिजे. आपल्याकडे पाणी फुकट मिळते अशी अद्याप सर्वांची भावना बनल्याने पाण्याचा बेसुमार व बेफिकीरीने वापर होताना दिसत आहे. दुष्काळाग्रस्त भागात ऊस, आले सारखे पिकाला पाठाने पाणी देऊन आपण कित्येक लीटर पाणी वाया घालवतोय याची अद्याप आपल्याला जाणिव नाही. इस्त्रायल सारख्या देशात पावसाचे प्रमाण आपल्यापेक्षा कितीतरी पटीने कमी असून देखील ते पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करत आहेत. म्हणूण ते आज प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकले. आपण पाण्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे. पाण्याने अग्नीचे शमन होत असते पण मानवाच्या बेफिकीरीने एक दिवस आग्नीशमन करणार्‍या पाण्याचाच भडका होऊन संपूर्ण मानवजात भस्मसात होण्याची शक्यता आहे.
एम. आर. शिंदे यांच्या सामाजिक कार्यातून युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून गेली 23 वर्षे त्यांचा स्मृती दिन विधायक उपक्रमाने केला जात असल्याचे विधाते यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी कटगुणचे प्राध्यापक प्रल्हाद गायकवाड व जितेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुसेगावचे उपसरपंच प्रकाश जाधव, सर्वोदयचे संस्थापक जीवन इंगळे, रशिद शिकलगार, दिलीप जाधव, महेश देशमुख, मुगुटराव पवार, मोहन कचरे, हणमंत घनवट, दशरथ घनवट, प्रा. गंगाराम शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. अविनाश कदम यांनी सुत्रसंचालन केले. विजयराव बोर्गे-पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget