Breaking News

ठाणे महापालिका झालीय सेटींगचा अड्डा - निलेश राणे यांचा आरोप


ठाणे : प्रतिनिधी
बिल्डरांच्या फायद्यासाठी ठाण्यात आरक्षणे बदलण्याचा धंदा सुरु करण्यात आलेला आहे. सध्या ठाणे महापालिका ही सेटींगबाजांचा अड्डा झालेला आहे. येथे सर्वच राजकीय पक्ष हे या सेटींगमध्ये गुंतलेले आहेत. असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी केला.याबाबतचे निवेदन पालिका आयुक्तांना दिले असून कारवाई न केल्यास स्वाभिमानच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल.असा इशारा दिला आहे.

माजी खासदार राणे यांनी आज ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन थिम पार्क घोटाळा, मॉडेला येथील स्मशानाचे आरक्षण उठवून तेथे नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव आणि विस्थापितांचे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भूखंडावर पुन:र्वसन करावे,या मागण्यांचे निवेदन दिले.यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.

राम मंदिराच्या मुद्यावर ते म्हणाले की, बाळासाहेबांचे स्मारक ज्यांना बांधायला जमले नाही. त्यांनी राम मंदिर बांधण्याची भाषा करु नये. विटा नेऊन ठेवणार कुठे? आधी संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ सेटींग केली आहे. त्यानंतरच हे उत्तर प्रदेशात जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा निर्णय 15 नोव्हेंपर्यंत होणार आहे. पण, मराठा मोर्चा ज्या दिशेला जाईल. त्या दिशेला आपणही जाणार आहोत, असे त्यांनी नमूद केले. तर, प्रकाश आंबेडकर हे समाजा-समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.