Breaking News

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक अधिकारी-उपायुक्तांची भेट

नगर । प्रतिनिधी -
मनपाच्या प्रारूप मतदार याद्यांवर विक्रमी हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये बीएलओंवर अनेक ठिकाणी लोकांनी ठपका ठेवला आहे. असेच एक प्रकरण प्रभाग 7 मध्ये घडले. यासंदर्भात आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकारी व उपायुक्तांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली आहे. हरकतदारांना बीएलओ यांनी सहकार्य करावे असे आवाहन मयूर पाटोळे यांनी केले.
प्रभाग 7 मधील नागपूर भागातील संभाजीनगर येथील 70 लोकांची नावे मनपाच्या प्रारूप मतदार यादीत आली नाही. ही नावे विधानसभेच्या 2019 च्या यादीत व मागील सर्व निवडणुकीत होती. यासंदर्भात या प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार मयूर पाटोळे यांच्याकडे संबंधीत मतदारांनी तक्रारी केल्या आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हरकत पण नोंदवली व आज या भागातील बीएलओशी संपर्क केला असता त्यांनी हा भाग मनपात समाविष्ट नाही. यावर पाटोळे यांनी प्रभाग यादी व नकाशात हा भाग समाविष्ट आहे हे दाखवून दिले तरी देखील त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
याबाबत लगेच त्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते बरोबर घेऊन मनपात निवडणूक अधिकारी तडवी यांची भेट घेतली व पुराव्यानिशी माहिती दिली. यावेळी फिरोजखान, अज्जू शेख, अमन तिवारी, योगेश दळवी, फरमान शेख, शुभम शिर्के आदींच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. तडवी यांनी खातरजमा करून उपायुक्त पठारे यांच्याकडे या शिष्टमंडळाला नेले.
यावेळी मयूर पाटोळे म्हणाले, बीएलओ यांनी हरकतदारांना सहकार्य करावे पण ते करत नाहीत व चुकीची माहिती देत आहेत. जाणीवपूर्वक शहरात असा घोटाळा झाला याला यामुळे पुष्टी मिळत आहे. आम्ही आमच्या हरकतीच्या पाठपुराव्यासाठी याना मदत करत आहोत. सत्य सांगण्यासाठी भेटत आहोत पण ते हा भागच मनपात नाही असे सांगतात. आम्ही पाठपुरावा नाही केला तर 6 नोव्हेंबरच्या सुनावणीत आमच्या तक्रारी निकालात निघतील.
उपायुक्त पठारे यांनी हे सर्व कागदोपत्री पाहून या बीएलओंशी फोनवर बोलून अशी उत्तरे आपण कसे देता असे विचारले. मनपाच्या नगर रचना विभागाच्या कर्मचार्‍याला घेऊन प्रत्यक्ष या भागात गेले का आपण? नसेल गेलात तर प्रत्यक्ष पाहणी करा व अहवाल द्या असे सांगितल्यावर काँग्रेस शिष्टमंडळाचे समाधान झाले. ज्या हरकती दाखल आहेत त्या ठिकाणी खरे तर बीएलओंनी प्रत्यक्ष हरकतदाराला नेऊन सत्यता पडताळणी पाहिजे नाहीतर याचा उपयोग होणार नाही असे सांगून मयूर पाटोळे म्हणाले की, सर्व पुरावे देऊनही ही नावे मतदार यादीत सामाविष्ट झाली नाही तर आम्ही आंदोलन करू.