Breaking News

राहुल यांची छत्तीसगडमध्ये ट्रम्पनीती, स्थानिकांनाच रोजगाराचे आश्‍वासन; मध्य प्रदेशात कर्जमाफीवर भर


कांकेर/भोपाळः छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परप्रांतीयांचा मुद्दा मांडत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नीती वापरावयाचे ठरवले आहे, तर मध्य प्रदेशात काँग्रेसने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर भर दिला आहे. गोशाळा आणि अन्य मुद्दे प्रचारात आणायचे ठरवले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्‍वासन दिले; पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. याऊलट आऊटसोर्सिंगमुळे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला. निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करून रिक्त पदे भरले जातील आणि स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल, असे आश्‍वासन गांधी यांनी दिले आहे. राहुल यांनी शनिवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरून मोदी सरकार आणि मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यावर टीका केली. रमणसिंह हे भ्रष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आले होते. पाकिस्तानमध्ये पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्याने पंतप्रधानांनाही तुरुंगात जावे लागले; पण छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. चिटफंड घोटाळा आणि पीडीएस घोटाळ्यातही रमणसिंह यांचा सहभाग होता. पीडीएस घोटाळ्यातील नोंदवहीत मुख्यमंत्री मॅडम आणि डॉक्टर साहेबांना पैसे दिल्याचा उल्लेख होता. हे दोघे कोण आहेत, हे रमणसिंह यांनी जनतेला सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास 10 दिवसांच्या आत शेतकर्‍यांचे कर्जमाफ केले जाईल. सध्या देशाचे चौकीदार भ्रष्टाचार, बेरोजगारी, नोटाबंदी अशा कोणत्याही विषयावर बोलत नाही, असे त्यांनी नमूद केले. मोदींच्या काळातच नीरव मोदी, विजय मल्ल्या हे बँकांचे पैसे बुडवून परदेशात पळाले. मोदींनी श्रीमंत उद्योजकांचे 3 लाख 50 हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले; पण गरीब शेतकर्‍यांचे कर्ज त्यांना माफ करता आले नाही, अशी टीका राहुल यांनी केली. आम्हाला एक जिल्हा किंवा विशिष्ट धर्म किंवा जातीसाठी नव्हे, तर सर्वांसाठी काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश काँग्रेसने शनिवारी आपला निवडणूक जाहारीनामा प्रसिद्ध केला. शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेऊन काँग्रेसने जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी, पिकांवर बोनस आणि प्रत्येक ग्रामपंचायतीत गोशाळा स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले आहे. काँग्रेसने या 112 पानी जाहीरनाम्याला वचन पत्र असे नाव दिले आहे. शेतकर्‍यांना वीज बिलामध्ये सवलत देण्याचाही काँग्रेसने शब्द दिला आहे. शेतकर्‍यांचे वीजबिल 50 टक्क्याने कमी करू. डिझेल, पेट्रोलचे दरही कमी करू, अशी आश्‍वासने काँग्रेसने दिली आहेत. गायींसाठी अभयारण्ये स्थापन करण्याबरोबरच गोशाळेत गोमूत्रापासून व्यावसायिक उत्पादने सुरू करण्याचे आश्‍वासन दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ, प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेसने मध्य प्रदेश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्‍वासन दिले आहे. निवडणूक जाहीरनाम्यात शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत आणि कोऑपरेटीव्ह बँकेकडून घेतलेले 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

गहू, सोयाबीन, मूग, चना, कांदा आणि ऊस या पिकांवर बोनस देण्याचाही शब्द देण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबातील एका बेरोजगार सदस्याला तीन वर्षांपासाठी 10 हजार रुपये बेरोजगार भत्ता, मुलीच्या लग्नाच्यावेळी 51 हजार रुपये तसेच भूमिहीन नागरिकांना घर बांधणीसाठी अडीज लाख रुपयांची तरतूद करण्याचे आश्‍वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.