फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर अयोध्या; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा


लखनऊ ः विकासकामांऐवजी भावनिक मुद्दयांवर राजकारण करण्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर दिला आहे. त्यांनी आता शहरांची नावे बदलण्याची मोहीमच हाती घेतली आहे. आता त्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर अयोध्या असे केले आहे. अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या वेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्यासंदर्भात घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती; मात्र त्यासंबंधी कोणताही उल्लेख त्यांनी केला नाही.

या कार्यक्रमासाठी दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किंवा प्रथम नागरिक किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या वेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अजून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार असून त्याला राजा दसरथाचे नाव देण्यात येणार आहे. तसेच एक विमानतळ उभारण्यात येणार असून त्याला प्रभू रामाचे नाव देणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले.

आम्ही आमचा भूतकाळ पुन्हा जोडण्यासाठी अयोध्येला आलो आहोत. अयोध्या ही रामाची ओळख आहे. अयोध्येची ओळख अयोध्या अशीच राहिली आहे. अयोध्येसोबत कोणीही अन्याय करू शकत नाही. एक नवीन संकल्प घेऊन आलो आहोत असे त्यांनी सांगितले. याआधी कोणी मुख्यमंत्री अयोध्येत आला होता का, असा सवाल विचारताना मी दीड वर्षात सहा वेळा अयोध्येला आलो असे त्यांनी सांगितले. फक्त घोषणांपुरते आपल्या देवांना मर्यादित ठेवले नाही पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget