Breaking News

मलेशियात अडकलेल्या भिवंडीतील तरुणाची मुक्तता; खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने मन्सूरी कुटुंबाला न्याय
ठाणे : प्रतिनिधी

एजंटने फसवणूक करुन नोकरीसाठी मलेशियात पाठविलेल्या भिवंडीतील तरुणाची मुक्तता करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खासदार कपिल पाटील यांनी संपर्क साधल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले टाकून मलेशियातील तरुणाची सुटका केली.

जावेद मन्सूरी हा भिवंडीत टेलर काम करीत होता. त्याला एका एजंटने मलेशियात बड्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविले. त्याला नोकरीत विविध प्रलोभने दाखविली. त्यानंतर त्याच्याकडून मलेशियात जाण्याचे तिकीट, व्हिसा आदींसाठी एक लाख 75 हजार रुपये घेतले. जावेद याला मुंबईतील विमानतळाऐवजी ओडिसातील भुवनेश्वर विमानतळावर बोलाविण्यात आले. विमानतळापासून काही अंतरावर जावेदचे मोबाईलवर शुटींग घेण्यात आले. त्यात मी स्वत:च्या मर्जीने जात असून, इमानदारीने काम करणार असल्याचे वदवून घेण्यात आले. जावेद हा मलेशियात पोचविल्यावर, तेथील एजंटने पासपोर्ट व व्हिसाची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर तो काही दिवस काम करीत होता. सात ऑगस्टच्या मध्यरात्री ते राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. तसेच जावेदकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कागदपत्रे नसल्याने त्याला चार तासांची मुदत देण्यात आली. या काळात जावेदने सातत्याने काम करीत असलेल्या ठिकाणच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिने कैद व दोन कोडे (चाबकाचे फटके) मारण्याची शिक्षा दिली. जावेदला दोन कोडे मारल्यानंतर तो कोसळला. तो पुढील 15 दिवस उभाही राहू शकत नव्हता. त्याचा तुरुंगातूनच भिवंडीतील कुटुंबियांशी संपर्क झाला. त्यावेळी त्याने आपल्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या कुटुंबियांनी भाजपचे पदाधिकारी नजीर मन्सूरी यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला.
खासदार कपिल पाटील यांनी तातडीने ही बाब परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना सांगितली. त्यानंतर केंद्र सरकारची यंत्रणा हलली. मलेशियातील भारतीय वकिलातीने मलेशियन सरकारशी संपर्क साधला. जावेद हा निर्दोष असून, त्याची फसवणूक झाली असल्याची बाब स्पष्ट केली. त्यानंतर जावेदची तातडीने सुटका करण्यात आली. या संदर्भात अवघ्या 15 दिवसांतच कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे मन्सूरी कुटुंबाने मोकळा श्वास घेतला.
मन्सूरी कुटुंबियांच्या
डोळ्यात आनंदाश्रू
दोन महिन्यांपासून जावेदचा काहीही फोन नसल्यामुळे मन्सूरी कुटूंब अस्वस्थ होते. त्यानंतर अचानक एके दिवशी त्यांना जावेद हा तुरुंगात असल्याची माहिती मिळाली. ती ऐकून मन्सूरी कुटुंबियांच्या पायाखालील जमीन घसरली. आपल्याला कोण मदत करणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. त्यांनी नजीर मन्सूरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जावेद घरी आल्यानंतर मन्सूरी कुटुंबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.