Breaking News

अमित शाह यांच्या विरोधातील याचिका फेटाळली


मुंबई/प्रतिनिधी


सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिलासा दिला आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणात शहा यांच्याविरुद्ध ठोस मुद्दाच नाही, असे म्हणत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डिसेंबर 2014 मध्ये अमित शहा यांना खटल्यातून दोषमुक्त केले होते. या निर्णयाला सीबीआयने वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले नव्हते. सीबीआयच्या या भूमिकेविरोधात बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे, असे या याचिकेत म्हटले होते. मात्र, हायकोर्टाने ही याचिकाच फेटाळल्याने अमित शाहांना दिलासा मिळाला आहे.

भाजपा सरकार आल्यापासून अनेक बडे मात्तबर राजकारणी न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर पडत आहे. विशेष करुन दंगली, दहशतवाद, भ्रष्टाचार, फसवणुक, खून खटले यातील भाजपाप्रणीत आरोपी दोषमुक्त होत असल्याने राजकीय, सामाजिक पातळीवर उलटसुलट चर्चा सुरू आहे.


काय होता अमित शहांवर ठपका?
सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, असा आरोप होता. डिसेंबर 2014 मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केलेले आहे.