Breaking News

पिग्मी एजंटला पोलिसांची अमानुष मारहाण; भुईंज पोलिसांची मोगलाई; चोर म्हणून निरापराध युवकास शिक्षा


सातारा  (प्रतिनिधी) : भुईंज पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचार्‍यांनी एका मोबाईल शॉपीत झालेल्या चोरी प्रकरणाचा संशयित आरोपी म्हणून पिग्मी एजंट धीरज अशोक कांबळे या तरुणाला शिरगाव घाटात आणि पोलीस स्टेशनच्या पाठीमागील गेस्टरुममध्ये विविस्त्र करुन अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. दरम्यान, खर्‍या आरोपीचा माग लागल्याने याच पोलिसांनी आम्हाला मदत कर, अशी धमकीवजा गळही धीरजला घातली आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीने मंगळवारी छातीत दुखू लागल्याने त्याला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित कर्मचार्‍याने पिडीत तरुणाला केलेल्या फोनचे रेकॉर्डिंगवरुन तो कर्मचारी याप्रकणात वरिष्ठांनीच या कर्मचार्‍यांना संबंधित तरुणाला आरोपी करा असे म्हटले असल्याचे धीरज कांबळे याने दैनिक लोकमंथनशी बोलताना सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 22 ते 23 च्या रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी भुईंज येथील आकाश मोबाईल शॉपी फोडली होती. भुईंज पोलिसांनी आकाश मोबाईल शॉपीतील सीसीटीव्ही फूटेजवरुन याच दुकानात एका पतसंस्थेची पिग्मी गोळा करण्यासाठी गेली दीड ते दोन वर्षे येणार्‍या भुईंज येथीलच धीरज कांबळे याच्यावर संशय व्यक्त करत त्याच्या मित्राच्या घरातून तपासासाठी नेले. मात्र, धायगुडे (पूर्ण नाव माहित नाही), संतोष शेलार व शुभम दुदुस्कर या तीन पोलीस कर्मचार्‍यांनी धीरज याला थेट शिरगावच्या घाटात नेले. त्याठिकाणी त्याची कपडे काढून त्याला पट्ट्याने आणि काठीने पाठीवर, पायावर, हातावर मारहाण करण्यात आली. 

यावेळी त्यांच्याकडील पिस्तुल दाखवून त्याला गुन्हा कबूल नाहीतर जीवे मारतो अशी धमकी दिल्याचे धीरज याने सांगितले. धीरज याने गुन्हा केला नसल्याने तो कबूल होत नव्हता. त्यामुळे या तिघांनी त्याला तू गुन्हा कबूल कर तुला आम्ही सोडवतो असे आमिष दाखवले. मात्र, धीरज बधला नाही. दरम्यान, या तिघांपैकी एकाला वरिष्ठांचा फोन आला त्यांनी त्याला गेस्ट रुमला आणा असा हुकूम सोडला. त्यामुळे या तिघांनी त्याला भुईज पोलीस स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या गेस्टरुममध्ये नेले. याठिकाणी पुन्हा त्याच्या अंगावरील कपडे काढून बेदम मारहाण केल्याचे सांगून धीरज म्हणाला, गुप्तांगाला दोरी बांधून तिला हिसके देण्यात आले. तसेच गुप्तांगावरील केसही ओढण्यात आले. यावेळी धीरज याने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तिघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते विशेष म्हणजे हे तिघेही कर्मचारी मारहाण करताना मोठमोठ्याने हसत होते. दरम्यान, धीरज याच्याकडे असलेले जॅकेट, पिग्मीसाठी दिलेले मशिन जप्त केले होते. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणार्‍या तरुणाने घातलेले जॅकेट तसेच पायातील सँडल आणि धीरजचेे असलेले सँडल आणि जॅकेटमध्ये अजिबात साम्य नसल्याचेही त्याने सांगितले. ही बाब लक्षात येताच याच पोलिसांनी त्याला हे जॅकेट परत दिले. धीरज याला मारहाण करताना धायगुडे व शेलार या दोन पोलीस कर्मचार्‍यांनी शिवीगाळ केली. दोन्ही पाय विलग करावयास लावून बुटाची लाथ धीरज याच्या छातीत मारली तसेच फॅन जोरदारपणे सुरु करत तब्बल तीन तास फरशीवर बसवून ठेवले. साडेअकरा वाजता त्याला घरी सोडण्यात आले. या काळात त्याच्या घराची झडती घेतली त्यात त्यांना काहीही आढळून आले नाही. बुधवारी रात्री दोन पोलीस कर्मचार्‍यांनी धीरज याच्या घरी जावून तुमचा मुलगा कोठे आहे? अशी चौकशी करत तुमच्या मुलाला आमच्याकडून चुकून मारहाण झाली आहे. याबाबत तुमची काही तक्रार नाही असे लिहिलेल्या कागदावर सही मागितली. धीरज याने या प्रकाराची जबरदस्त भीती घेतली आहे. दरम्यान, तो काम करत असलेल्या पतसंस्थेने त्याला पिग्मी गोळा करण्याचे काम काही दिवस थांबविण्यास सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या चुकीचा फटका निरपराध तरुणाला बसला असून त्याच्या हातचा हक्काचा रोजगार गेल्याने त्याच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. 

केवळ संशयित म्हणून एखाद्या एकाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत आहे. छातीवर बुटाची लाथ मारल्याने दुखू लागल्याने धीरज हा सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. येथेही त्याची चौकशी करण्यासाठी एक पोलीस कर्मचारी आला होता. मात्र, त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याने आणि औषधोपचार सुरु असल्याने तो परत गेला. 

दरम्यान, पोलिसांना खरा गुन्हेगार सापडला असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी धीरज याला आम्हाला सहकार्य कर अशी धमकीवजा गळ घातली आहे. तसेच घरी जावून जरा मालिश कर बरं वाटेल, असेही सुचविण्यात आले. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना देण्यासाठी गेलो होतो मात्र, त्यांना भेटण्याची वेळ संपली असल्याचेही धीरज याने सांगितले. रक्षणकर्ते म्हणून काम करणार्‍या पोलिसांनी सामान्य नागरिकांना अशी वागणूक दिली तर त्यांनी न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचे? असा प्रश्नही यानिमित्त त्याने उपस्थित केला. दरम्यान, याबाबत धीरज कांबळे याने कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच इतर दलित संघटनांनाही देण्यात येणार आहे.