Breaking News

महापालिका मुख्यालय समोर पार्किंग केलेल्या महिला अधिकारीच्या गाडीवर चोरट्याने केली हातसफाई


ठाणे : प्रतिनिधी

ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर पार्किंग केलेल्या कारवर अज्ञात भुरट्या चोरट्याने हात सफाई केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. चोरट्याने गाडीची काच फोडून अडीच हजार आणि महत्वाचे पेपर लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.


ठाण्यात भुरटे चोरटे हे गर्दीची ठिकाणे आणि पार्किंग केलेल्या वाहनाच्या शोधात घिरट्या मारीत असल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी अज्ञात चोरट्याने चक्क पालिकेच्या समोर पार्किंग केलेली ठाणे पालिका शहर विभाग विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी राजेश्री विरणकर यांच्या गाडीची काच फोडून हातसफाई केली. गाडीत ठेवलेली अडीच हजाराची रोख रक्कम आणि महत्वाचे पेपर घेऊन चोरट्याने पोबारा केला. मुख्यालयातून बाहेर पडलेल्या विरणकर या गाडीजवळ गेल्या असता काच फोडल्याचे लक्षात आले. दरम्यान त्यांनी गाडीत ठेवलेल्या वस्तूची तपासणी केल्यानंतर अडीच हजर रुपये आणि पालिकेचे महत्वाचे दस्त गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात तक्रार केली. पालिका मुख्यालयासमोर शेकडो गाड्या आसपास पार्किंग करण्यात येतात. मात्र वर्दळीच्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाडीची काच फोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे