Breaking News

तीनही राजांविरोधात उमेदवार देणार; लक्ष्मण माने यांची घोषणा; उदयनराजेंच्या आरक्षणविरोधी विधानाचा निषेध


सातारा (प्रतिनिधी) ः विधानसभा आणि लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जिल्ह्यातील तीनही राजांविरोधात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ते, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते.

धनगर आरक्षणाचे समर्थन करताना खासदार उदयनराजे भोसलेे यांनी नुकतेच दलितांचे आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा असे विधान केले होते. त्याचा माने यांनी निषेध केला. याबाबत माने म्हणाले, की उदयनराजे हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला अडचणीत मदतही केली आहे; मात्र वैचारिक मांडणी करताना त्यांनी केलेल्या विधानाशी मी कदापिही सहमत नाही. 2012 पासून शासनाने कोणत्याच राखीव जागांची भरती केलेली नाही. या राखीव जागा फक्त कागदावरच आहेत. दलित समाजाला राखीव जागा देण्याबाबत संविधान तयार होत असतानाच चर्चा झाली आहे. तसेच आर्थिक निकष ही बाब फसवी असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही नमूद केले आहे. 
खासदारांनी जपून बोलायला हवे होते. राखीव जागा रद्द करणे अथवा ठेवणे हा संसदेचा विषय आहे. त्यांनी याबाबत आपले म्हणणे संसदेत मांडावे. गरीबीत जन्म झाला, म्हणून आम्ही कायम गरीबच राहायचे का, असा सवाल करत माने म्हणाले, की भारतातील सगळ्या ब्राह्मणांनी आपला देवाळांवरील ताबा सोडावा, उद्योगपतींनी मिळवलेला भरमसाठ नफा सरकारी तिजोरीत जमा करावा तसेच क्षत्रियांनी आपले क्षत्रियत्व नाकारावे. मग, आम्ही आमचा राखीव जागांवरील हक्क सोडण्यास तयार आहोत. 
अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर करणार्‍या आमच्या माणसालाही शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. गेली 70 वर्षे बहुसंख्येने असलेल्या एका विशिष्ट जातीच्या उमेदवारांचे सरकार होते. त्या वेळी त्यांनी आपल्या समाजासाठी काय केले? त्या वेळी त्यांना कोणी अडवले होते का, असा सवाल करत त्यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यासह सर्व मराठा समाजातील आमदार, खासदारांनाही याबाबत दोष दिला.
पटेल यांनी भारतातील सगळी संस्थाने खालसा केली असली, तरी छत्रपती शिवरायांवरील श्रद्धेपोटी, प्रेमापोटी आम्ही आजही उदयनराजेंना मान देतो; मात्र ते सातत्याने ब्राह्मणांना ताकद देत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
आम्ही एमआयएमशी युती केली, यावर लोकांचा आक्षेप असेल तर त्यांनी एमआयएम ही अतिरेकी संघटना कशी, याचे उत्तर द्यावे. त्यांचे लोकसभेत प्रतिनिधी आहेत. त्यांना जनाधार आहे, हे सिद्ध झाले आहे; मात्र गेली अनेक वर्षे कोणतीही कागदोपत्री नोंद नसलेली आरएसएस देशविघातक कृत्य करत आहेत. दसर्‍याला होणारे शस्त्रपूजन हे बेकायदेशीरच आहे. सामान्य माणसांकडे साधे हत्यार सापडल्यास त्याला लगेचच अटक होते. मग, आरएसएसकडे असलेली अत्याधुनिक हत्यारे कोणच्या परवानगीने बाळगली आणि पूजली जात आहेत असा सवालही त्यांनी केला.

भिडे नव्हे, तर आम्ही मावळे
शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल असताना त्यांना अटक का होत नाही? ते सरकारचे जावई आहेत का? असा सवालही माने यांनी या वेळी उपस्थित केला. भिडेंच्या कोणत्या पूर्वजाने गडकिल्लांचा एकतरी दगड बसवला आहे का? आमच्या बहुजन समाजातील मावळ्यांनी हे गडकोट उभारले आहेत. आम्हीही शिवरायांचेच मावळे आहोत, असे ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करणार

माने म्हणाले, की बहुजन वंचित आघाडी ही सर्वांना बरोबर घेवून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढणार आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांना झालेल्या नकारात्मक मतदानाने भाजपचा फायदा झाला. आता लोक भाजपच्या फसव्या घोषणांना कंटाळले आहेत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार असा विश्‍वासही व्यक्त केला.