Breaking News

खंबाटकीच्या नवीन बोगद्यांसह रस्त्यांच्या कामासाठी 10 हजार कोटींचा निधी


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यांच्या व विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज उपलब्ध झाले असून या कामांचा भूमिपूजन सोहळा रविवार दि.23 रोजी सकाळी 10 वाजता सैनिक स्कूल मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पावसकर म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विकासकामे आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही खंबाटकीच्या सहा पदरी बोगद्याच्या कामासह प्रमुख रस्त्याकरता त्वरीत मंजुरी दिली. सुमारे 10 हजार कोटी रूपयांच्या कामांचे भुमिपूजन सोहळा सैनिक स्कुलच्या मैदानावर होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, ना. गिरीष बापट यांच्यासह विविध मंत्री व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.पोलादपूर-महाबळेश्‍वर , वाई, भाडळे दहिवडी रस्त्याचे रूंदीकरण व दुरूस्ती 18 किमीसाठी 13 कोटी 50 लाख रुपये, गुहागर चिपळूण, कराड, जत विजापूर रस्ता रूंदीकरण व दुरूस्तीच्या 15 किलोमीटरसाठी 20 कोटी रूपये,महाबळेश्‍वर सातारा रहिमतपूर रस्ता रूंदीकरण 60 कोटी रुपये, वाई पिंपोडे रस्त्यासाठी 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.सातारा व पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.तसेच अपघाताचे प्रमाण टळण्यास मदत होणार आहे. भविष्यकाळात मोठ्या एमआयडीसी, आयटी मॉल, आयटी पार्क अशी विकासात्मक कामे भाजपा सरकारद्वारे केली जाणार आहेत. 

काँग्रेसच्या काळात कोणतीही महत्वाची विकास कामे करण्यात आली नाहीत त्यामुळे सातारा जिल्हा खुप मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता म्हणून भाजप सरकार मोठ्या प्रमाणात विकास कामांचा डोंगर उभा करत आहे.या रस्त्यांच्या कामाबरोबरच जलसंपदा विभागाच्या सहा प्रकल्पांची देखील घोषणा यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये मोरणा गुरेघर, तारळी, कुडाळी, वांग या योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमधून केल्या जाणार आहेत. तसेच उरमोडी बळीराजा कृषीसिंचन योजनेचाही यामध्ये समावेश आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 968 कोटी आणि राज्य शासनाकडून 4 हजार 432 काटी असे मिळून 5 हजार 310 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला आहे.यावेळी धोम बलकवडीचे पाणी पूजन होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पावसकर यांनी केले आहे. हा भाजपाचा जरी कार्यक्रम असला तरी प्रोटोकॉलनुसार सर्वांना कार्यक्रमाला बोलावले आहे. यावेळी जि. प. सदस्य दीपक पवार, महेश शिंदे, अनिल देसाई, अ‍ॅड. भरत पाटील, दत्ताजी थोरात, नगरसेवक धनजंय जांभळे, विजय काटवटे, मिलींद काकडे, सिध्दी पवार, सागर पावशे, अ‍ॅड. प्रशांत खामकर, अभय पवार, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी व पदाधिकारी उपस्थित होते.