Breaking News

हिवरा आश्रम येथील शिबीरात 1,300 रुग्णांची नेत्रतपासणी


हिवरा आश्रम,(प्रतिनिधी): विवेकानंद आश्रम हे सेवा केंद्र असून संस्थेचे ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे कार्य अतुलनीय आहे. सार्वजनिक संस्था शासनासोबत सहकार्य करतात म्हणून आरोग्य विभाग प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत आहे. शुकदास महाराजांची जनसेवा लक्षात घेऊन शासनाने हिवरा आश्रम येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले.

 या रुग्णालयात भेट दिली शासनाच्या सुधारीत टाईप प्लॅन मधील बांधकाम असलेले हे रुग्णालय म्हणजे कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांचे खरे स्मारक आहे, असे उद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी काढले. विवेकानंद आश्रमात 5 डिसेंबर रोजी आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. निष्काम कर्मयोगी प.पू.शुकदास महाराज यांच्या 75 व्या जयंती सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर, विज्ञान प्रदर्शनी, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित नेत्रशिबीराचा लाभ सुमारे 1,300 रुग्णांनी घेऊन नेत्रतपासणी केली.

 मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय बुलडाणा येथे ऑपरेशन कूपन मिळेल असेही डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले. या शिबिरात नेत्रतपासणी सोबत हिमोग्लोबिन, कॅल्शियम,युरीक अ‍ॅसिड,मधुमेह इत्यादी तपासणीही करण्यात आली. या शिबिरात डॉ.प्रशांत दिवठाणे,डॉ.संजय राठोड, डॉ.सुजाता भराड ,विवेकानंद आश्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गिर्‍हे,नेत्र चिकित्सा अधिकारी सवडतकर, खिल्लारे, जावेद ठेकिया या तज्ज्ञांनी आपली मोफत सेवा देऊन रुग्णांची सेवा केली.

  दरम्यान सकाळी ग्रामसफाई करून गावामधून दिंडी परिक्रमा करण्यात आली. हजारो भाविकांनी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय उत्कृष्ट वक्ता स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.