Breaking News

वैरागड तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात 15 दिवसांत त्रुटी पूर्ण करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष औटी यांचे आदेश

 


चिखली,(प्रतिनिधी): तालुक्यातील वैरागड संग्राहक तलावाचे रखडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता असून, मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून आमदार बोंद्रे यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणासंदर्भात 14 डिसेंबर रोजी विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत औटी यांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीने त्रुटी पूर्ण करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले व 28 डिसेंबरला पुन्हा बैठकही लावण्याचे सांगितले आहे. या बैठकीला आ. राहुल बोंद्रे यांच्यासह जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथराव डवले, कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर, उपकार्यकारी अभियंता जुरावत, विनंती अर्ज समिती विधानभवन अवर सचिव रंगनाथ खैरे व सुरेश मोगल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


मागील बैठकीच्या कामकाजात ज्या स्वाक्षर्‍या मुद्यांची त्रुटी राहिली होती. त्यापैकी चार मुद्यांच्या त्रुटीतील पूर्तता करण्यात आलेली आहे. आता उर्वरित दोन मुद्यांच्या त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 1 सर्वसाधारण आराखडा मंजुरीपत्र आवश्यक असल्याने योजनेचा आरेखन प्रस्ताव तयार करून प्रादेशिक अधिकारी मृद जलसंधारण विभाग अमरावती यांच्या कार्यालयाकडे सादर करणे व आरेखन प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रादेशिक अधिकारी अमरावती यांच्याकडून प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थळी पाहणी करून प्रकल्प आराखडा मंजुरीपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही करणे, तसेच मुद्दा क्रमांक 2 ची त्रुटी पूर्तता करण्यासाठी भू तांत्रिक अहवाल आवश्यक असल्याने योजनेचा भू तांत्रिक अहवाल तयार करून वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा बुलडाणा या कार्यालयाकडे सादर करून प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करणे व प्रकल्पाचा भू तांत्रिक अहवाल सादर करण्याची कार्यवाही 15 दिवसात करण्यात येईल, या प्रमाणे मुद्ा क्रमांक 1 व 2 बाबत कार्यवाही करून प्रकल्प आराखडा मंजुरीपत्र भू तांत्रिक अहवाल काटक्षेद संकल्पन करण्यासाठी अधीक्षक अभियंता (धरण) संकल्प चित्र मंडळ मध्यवर्ती, संकल्प चित्र संघटना नाशिक कार्यालयाकडे योग्य मार्गाने सादर करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या दोन त्रुटी पूर्ण झाल्यानंतर वैरागड संग्राहक तलावाचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या बैठकीला युवक काँग्रेसचे राम डहाके वैरागड येथील भारत तावडे, राम कोकाटे, उद्धव गव्हाणे, प्रकाश कोकाटे, अमोल तोंडे, गणेश सप्रे, गोपाल निघडे, अंगद गव्हाणे, संतोष वारंगळे, सतीश डहाके हे शेतकरी उपस्थित होते.