Breaking News

सरकार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणारः आठवले


सोलापूर (प्रतिनिधी)- सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यावर 15 लाख देण्यासह जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मुद्दा आपण एनडीएच्या बैठकीत मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यात भाजपची 15 वर्षे सत्ता होती, म्हणून लोकांनी बदल केला आहे, तर राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदलते हा अनुभव आहे. तीनही राज्यातील काँग्रेसचा विजय राहूल गांधीचा नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभवदेखील नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेस राफेलबाबत खोटे बोलून गैरसमज पसरवत आहे. राफेल प्रकरणी न्यायालयाने सरकारला क्लीन चिट दिली आहे. आता खोटे बोललात, तर फटका बसेल असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. 2019 मध्ये एनडीएचेच सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्‍वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तामीळनाडूमध्ये स्टॅलिन म्हणाले राहुल पंतप्रधान होतील; पण इतरांचा त्याला विरोध आहे. महाआघाडी झाल्यास एकाच्या नावावर एकमत होणार नाही. पुढील दहा वर्षे मोदीच पंतप्रधान राहतील असेही ते म्हणाले.