Breaking News

तारळीच्या कामासाठी 1610 कोटीचा निधी : आमदार देसाई


पाटण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील तारळी धरणासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 1610.32 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नुकताच पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

तारळी धरण प्रकल्पातून 50 मीटर हेडच्या वरील जमिन क्षेत्राला प्राधान्याने पाणी मिळवून देणेसाठी सन 2009 पासून आपला प्रयत्न सुरु होता. त्यास आता चांगलेच मोठे यश मिळाले असून सन  2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या वचननाम्यामध्ये दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता यानिमित्ताने झाल्याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रीया आ. देसाई यांनी याबाबत व्यक्त केली आहे.

आमदार शंभूराज देसाईंनी याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे की,  तारळी प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केला आहे. या धरणातून विभागातील 100 टक्के जमीन क्षेत्र ओलिताखाली आणून उर्वरीत राहिलेले पाणी विभागाच्या बाहेर देण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याची भूमिका आम्ही घेतली होती या विभागात 50 मीटर हेडपर्यंत पाणी देवून उर्वरीत पाणी बाहेर देण्याचे नियोजन लक्षात आलेपासून मी 100 टक्के जमिन क्षेत्राला पाणी देण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली याकरीता या विभागातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात मला सहकार्य केले.

सन 2009 पासून माझे याकरीता प्रयत्न सुरु होते त्यास 9 वर्षांनी यश आले. या विभागातील 100 टक्के क्षेत्रास पाणी द्यायचे असल्यास प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे गरजेचे होते. ही सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याचे काम युतीच्या शासनाच्या काळात झाल्याचे समाधान वाटते आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मंजुरीकरीता सादर करण्यात आला होता. मंत्रीमंडळाची वाढीव खर्चास मान्यता मिळाल्याने आजवरच्या सलग 9 वर्षाच्या आमच्या संघर्षाला, मागणीला आणि पाठपुराव्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाल्याने तारळे विभाग सुजलाम सुफलाम करण्यास मदत करणार असल्याचे देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.