Breaking News

काँग्रेसच्या 25 आमदारांसाठी भाजपचा गळ!


बेंगळूरू : बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपकडून ऑपरेशन कमळ राबविण्यात येणार आहे. कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांसह काँग्रेसमधील सुमारे 25 आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येणार असल्याची माहिती गुप्तचर अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दिली आहे. याबाबतचे काही पुरावे गुप्तचर खात्याला मिळाले आहेत. 

प्रदेश भाजपमधील दिग्गज नेत्यांनी व्यावसायिकांच्या माध्यमातून काँग्रेसमधील काही आमदारांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या संभाषणाचा ‘ऑडिओ’ पुरावा मिळाला आहे. काही कोटी रुपयांची डील करतानाची चर्चा त्यामध्ये ऐकू येते. पुन्हा निवडणूक लढविताना संपूर्ण खर्च देण्याची तयारी असल्याचे आश्‍वासन संभाषणाच्या ‘ऑडिओ’मध्ये देण्यात आले आहे. कोणताही आमदार भाजपच्या संपर्कात राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना गुप्तचर खात्याने दिली आहे. दरम्यान, आमदार सतीश जारकीहोळी, मुरुगेश निराणी, योगीश यांनी हॉटेलमध्ये बैठक घेऊन नाराज आमदारांबाबत चर्चा केल्याचे समजते. काँग्रेसचे आमदार एम. बी. पाटील यांनी आपण मंत्रिपदासाठी इच्छुक आहे; पण त्याकरिता पक्षत्याग करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

कर्नाटक विधानसभेचे 10 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सूचनेनुसार ऑपरेशन कमळ राबविले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी काही काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या नेत्यांना आगाऊ रक्कम दिली. ती त्यांच्याकडेच असून कोणत्याही वेळी ते भाजपप्रवेशासाठी तयार असल्याची माहिती मिळाली आहे. भीमा नायक (हगरीबोम्मनहळ्ळी), नागेंद्र (बळ्ळारी ग्रामीण), बी. सी. पाटील (हिरेकेरुर), डॉ. सुधाकर (चिक्कबळ्ळापूर), आनंद सिंग (विजयनगर), जे. एन. गणेश (कंपली), प्रतापगौडा पाटील (मस्की), नागेश (अपक्ष, मुळबागिलु) हे सर्व आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असून ते नाराज आहेत. त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.