Breaking News

कराड तालुक्यातील रस्त्यांसाठी 28.25 कोटींचा निधी


कराड,
 कराड तालुक्यातील 15 रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर कराड तालुक्यातील विविध दहा मार्गांवरील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी 28 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कराड दक्षिणमधील आठ मार्गांचा समावेश असून त्यासाठी 23 कोटी 95 लाख रूपये; तर कराड उत्तरमधील दोन रस्त्यांसाठी चार कोटी 30 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन आदेश मंगळवारी (ता. 4) काढण्यात आला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्यांना तातडीने भरघोस निधी मंजूर केल्याने, कराड तालुक्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत होण्यास मदत होणार आहे.


कराड तालुक्यातील अनेक महत्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमधील रस्ते इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग स्वरूपाचे होेते. त्यामुळे त्यांची डागडुजी जिल्हा परिषदेमार्फत होत होती. पण या रस्त्यांचा मोठा आवाका पाहता यावर मोठा निधी टाकणे जिल्हा परिषदेला शक्य नसल्याने, या रस्त्यांमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नव्हते. शिवाय जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील या रस्त्यांवर मजबुतीकरण, देखभाल, दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळण्यातही अनेक अडचणी येत होत्या.

 या गावांमधील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असल्याने अनेक मार्गांची सातत्याने दुरावस्था होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर या रस्त्यांचा समावेश प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत व्हावा, यासाठी नामदार डॉ. अतलु भोसले यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. नामदार डॉ. भोसले यांच्या मागणीची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने कराड तालुक्यातील 220.670 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश प्रमुख जिल्हा मार्गात करण्याचा गेल्या महिन्यात 16 नोव्हेंबरला घेतला.


या 15 रस्त्यांना दर्जोन्नती मिळून महिना व्हायच्या आतच आता सार्वजनिक बांधकाम खात्याने 15 पैकी 10 रस्त्यांच्या नुतनीकरण व मजबुतीकरणासाठी तब्बल 28 कोटी 25 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कराड दक्षिणमधील 8 रस्त्यांसाठी 23 कोटी 95 लाख रूपये; तर कराड उत्तरमधील दोन रस्त्यांसाठी 4 कोटी 30 लाख रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे.