Breaking News

सातारा मतदारसंघातील रस्त्यांच्या चार कामांसाठी तीन कोटी 36 लाख


सातारा,(प्रतिनिधी) : शहरातून जाणार्‍या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्यातील शेरेवाडी तेे कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी सन 2018- 19 च्या अर्थसंकल्पात तीन कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून या चारही कामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्यांची लवकरच दर्जेदार सुधारणा होणार आहे.

बेल्हे शिक्रापूर, जेजुरी, लोणंद ते सातारा या राज्यमार्ग 117 मधील सातारा शहरातील पोवई नाका ते पोलीस कवायत मैदान या मार्गाची सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पात 65 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सातारा, कोरेगाव ते पंढरपूर, मोहोळ राज्यमार्ग क्रमांक 141 या रस्त्यावरील सातारा पंचायत समिती ते जिल्हा परिषद चौक या भागाची सुधारणा करण्यासाठी एक कोटी 20 लाख रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

सातारा तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक 140 ते सोनगाव कुमठे, आसनगाव रस्ता प्रगत जिल्हा मार्ग क्रमांक 31 मधील शेरेवाडी ते कुमठे या भागाची सुधारणा करण्यासाठी 51 लाख रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सातारा, गजवडी, ठोसेघर ते चाळकेवाडी या प्रगत जिल्हा मार्ग क्रमांक 29 या रस्त्यामधील बोगदा ते डबेवाडी आणि मानेवाडी ते गजवडी फाटा दरम्यानच्या रस्त्याची सुधारणा करण्यासठी एक कोटी रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

या सर्व कामांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुचनेवरुन निधीची तरतूद करण्यात आली असून तातडीने शासकीय सोपस्कार पुर्ण करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी आणि रस्त्यांची कामे दर्जेदार करावीत, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत.