Breaking News

पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन राजधानी साताराच्या मराठा क्रांती मोर्चाने 42 हुतात्म्यांना अभिवादन


सातारा : मराठा समाजास उशिरा का होईना, पण आरक्षण देण्यासाठी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी एकमुखी पाठिंबा दिला. राज्यभरात तब्ब्ल 58 मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले. 

मात्र, 42 मराठा बांधवानी समाजाच्या मागण्यांसाठी प्राणांची आहुती दिली. या मराठा बांधवांना पोवई नाक्यावरील शिवपुतळ्याजवळ श्रद्धाजंली अर्पण करण्यात येवून मिळालेले 16 टक्के आरक्षण त्यांना अर्पण करण्यात आले. यावेळी 13 हजार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेवून कोपर्डीतील भगिनीवर अत्याचार करणार्‍या आरोपींना फाशी झालेली पाहिल्यानंतरच जल्लोष करण्याचा निर्णय राजधानी सातार्‍याच्या मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतला.

गुरुवारी दुपारी विधानसभेसह विधानपरिषदेत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासाठी आवश्यक विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी विधेयक मंजुरीनंतर जल्लोष करण्याचे टाळत 42 मराठा बांधवांच्या बलिदानामुळेच हे शक्य झाल्याची भावना व्यक्त करत सातारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकासह समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहीद मराठा समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी शरद काटकर म्हणाले, मराठा समाज लाखोंच्या संख्येने अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरला. नेतृत्वहीन असे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजातील जनतेची चार दिशेला चार तोंडे असल्याने त्याचा फायदा राजकारण्यांनी घेतला. 30 वर्षानंतर लढ्याला यश आले आहे पण हा लढा येथे संपला नाही. अट्रॉसिटीसह अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील नोकर भरती याबाबत लढा उभारावा लागेल. 

हरीष पाटणे म्हणाले, राजधानी सातार्‍यात 35 लाखांचा मराठा मोर्चा निघाला तेव्हाच राज्य सरकारला धडकी भरली. मिळालेले आरक्षण हे कष्टकरी जनतेने लढा उभारल्याने मिळाले आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. ज्या दिवशी कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार करणारे फासावर लटकतील त्याच दिवशी जल्लोष होईल. तोपर्यंत आरक्षणाच्या कायदेशीर प्रक्रियेसह सर्व बाबींच्या लढाया मराठा समाज धुरिणांनी सुरूच ठेवाव्यात. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कुणाच्या बापाचं’ ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाई जय शिवराय’, ‘जय शिवाजी जय भवानी’, ‘कोण म्हणत देत नाय घेतल्याशिवाय राहिलो नाय’ अशा घोषणाही देण्यात आल्या.यावेळी जीवनधर चव्हाण, शरद जाधव, अनिल देसाई, प्रशांत पवार, प्रवीण जाधव, संदीप पोळ, सुनील शितोळे, बापू क्षीरसागर, वैभव चव्हाण, विवेक कुराडे, राजू महाडिक, संदीप नवघणे, शिवाजीराव काटकर, शिवाजीराव जाधव, प्रशांत नलावडे, प्रशांत निंबाळकर, ऍड. उमेश शिर्के, अर्चना देशमुख, संमिद्रा जाधव, प्रिया साबळे, मयुरी फडतरे, शिवानी घोरपडे, सुवर्णा पाटील, जयश्री शेलार, संचिता तरडे व मराठा बांधव उपस्थित होते.