Breaking News

हेमंत ट्रेडिंग कंपनीच्या मालकास 5 हजाराचा दंड


कराड (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणार्‍या पालिकेच्या आरोग्य विभागाने आज सकाळी मार्केट यार्डमधील गेट नंबर चारच्या परिसरात प्लॅस्टिक ग्लासचे दहा बॉक्स जप्त करून हेमंत ट्रेडिंग कंपनीच्या मालकास पाच हजार रूपयांचा दंड केला.

याबाबत अधिक माहिती अशी, शासननिर्णयानुसार प्लॅस्टिकबंदी मोहिमेच्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य विभागाची पथके रोज शहरातील विविध भागात लक्ष ठेवून असतात. आज सकाळी मार्केट यार्डमध्ये गेट नंबर चारच्या परिसरात उभ्या असलेल्या एका टेम्पोतील साहित्याबाबत संशय आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी टेम्पोतील मालाची तपासणी केली. 

त्यावेळी टेम्पोत प्लॅस्टिकच्या ग्लासची दहा बॉक्स आढळून आली. ती बॉक्स जप्त करण्यात आली. हा माल हेमंत ट्रेडिंग कंपनीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित दुकानमालकास पाच हजाराचा दंड केला. 

आरोग्य विभागाने शनिवारीही एका भांडी दुकानातून प्लॅस्टिक जप्त करून पाच हजार रूपयांचा दंड केला होता. त्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी (रविवारी) पुन्हा प्लॅस्टिक ग्लासची दहा बॉक्स जप्त करून प्लॅस्टिक बंदीची मोहिम जोरदारपणे सुरू ठेवली आहे.