Breaking News

उद्योजगताच्या प्रशिक्षणातून महिलांचे सबलीकरण होण्यास मदत : सौ. वेदांतिकाराजे


शेंद्रे, (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धेच्या आणि महागाईच्या जमान्यात कुटूंबाचा गाडा चालवण्यासाठी पतीबरोबरच पत्नीनेही हातभार लावणे अनिवार्य आहे. त्यामुळे महिलांनी चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. तसेच शासनामार्फत राबवल्या जाणार्‍या सर्वप्रकारच्या प्रशिक्षण शिबीरांचा लाभ घेतला पाहिजे. फॅशन डिझाईन, मसाल्याचे पदार्थ बनवणे आदी प्रकारच्या उद्योजकता प्रशिक्षण शिबीरातून महिलांचे आर्थिक सबलीकरण घडेल, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

शेंद्रे ता. सातारा येथे ग्रामपंचायतीमार्फत 14 व्या वित्त आयोग निधीमधून महिलांसाठी फॅशन डिझाईन, मसाल्याचे पदार्थ बनवणे, आकर्षक कापडी पिशव्या बनवणे आदी प्रकारचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. स्वयंमसिध्दा महिला विकास संस्थेच्या सहकार्याने आठ दिवस चालणार्‍या या प्रशिक्षण शिबीरात शेंद्रे येथील 50 महिलांनी सहभाग घेतला. या शिबीराच्या समारोप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप केले.

याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी स्वयंमसिध्दा महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. समिंद्रा जाधव, सरपंच सौ. मीना वाघमारे, विष्णू जाधव, संतोष पोतेकर, विजय पोतेकर, सौ. अर्चना पोतेकर, अमर मोरे, अस्लम मुलाणी, ग्रामसेवक गोविंद माने, प्रशिक्षक सौ. संगीता चव्हाण, सौ. मनिषा शिंदे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांना विविध प्रकारच्या उद्योगांची माहिती मिळावी. त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने फॅशन डिझाईन, मसाल्याचे पदार्थ बनवणे, शिलाई काम, संगणक प्रशिक्षण आदी प्रकारच्या प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन शासन करत असते. शेंद्रे ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करुन महिलांच्या सबलीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. या शिबीरातून महिलांनी स्वत:चे लघूउद्योग सुरु करावेत. बचतगटांच्या माध्यमातूनही महिलांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधली पाहिजे. केवळ प्रमाणपत्र मिळावे म्हणून प्रशिक्षण न घेता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे रहावे आणि आपल्या कुटूंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महिलांनी हातभार लावावा. तरच अशाप्रकारच्या प्रशिक्षण शिबीरांचा उद्देश सफल होईल, असेही सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.