Breaking News

सातार्‍यात सोमवारी ग्रंथजत्रेचे आयोजनसातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : मुंबईतील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, कोलकाता येथील राजा राममोहन राँय ग्रंथालय प्रतिष्ठान व जिल्हा ग्रंथालय आधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 10 रोजी सातार्‍यात राजा राममोहन राँय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेतून जिल्हा ग्रंथालय आधिकारी कार्यालय सातारा यांच्यातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी यांच्या 150व्या शतकोत्तर जयंतीनिमित्त ग्रंथजत्रा (बुकफेअर) आयोजित करण्यात आली आहे

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या ग्रंथजत्रेचे उदघाटन बडोद्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार असून प्रमुख राजा राममोहन राँय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय आधिकारी अनंत वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांची त्या वेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी एक परिवर्तनीय व्यक्तिमत्व या विषयावर साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांचे व्याख्यान होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलुजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विष्णू सुर्वे असतील. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्रा. दीपक मुंगूसकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत नलवडे, जिल्हा माहिती आधिकारी युवराज पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कवी प्रल्हाद पार्टे सूत्रसंचालन करणार आहेत. हा ग्रंथजत्रेचा कार्यक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी नगरी, अजिंक्य काँलनी मैदान, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासमोर, पोवई नाका सातारा येथे होणार असून ग्रंथप्रदर्शन व विक्री दि. 10 व 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथविक्री होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी दिली आहे.