Breaking News

कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी फरदड घेऊ नये : कृषी विभागाचे आवाहनबुलडाणा,(प्रतिनिधी): गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी डिसेंबर अखेरच्या वेचणी नंतर शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यास सोडाव्यात. जनावरे कपाशीच्या झाडावरील पाने, बोंडे खातील व त्यामधील असलेल्या किडी रोगाच्या अवस्थांचा सुद्धा नायनाट होईल.

शेतकर्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत खोडवा किंवा फरदड घेऊ नये. डिसेंबर नंतर कपाशीचे पीक पूर्णपणे काढून टाकावे. रोटाव्हेटरने शेतातील पर्‍हाट्या नष्ट कराव्यात किंवा सेंद्रिय खतांमध्ये रूपांतरित करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कापूस पिकांवर आढळून येणार्‍या किडींची त्यांच्या नुकसानीच्या प्रकारावरून दोन गटांत विभागणी करता येईल. पहिल्या गटात येणार्‍या किडी म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी इत्यादी रस शोषक किडी आणि दुसर्‍या गटात येणार्‍या किडी म्हणजे हिरवी बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी आदीचा प्रादुर्भाव आढळून येतो.

कपाशीवरील बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी बी.टी. वाणाचा वापर केला जातो. मागील वर्षांपासून कपाशी पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने कपाशी पिकाचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने किडीचा जीवनक्रम खंडित करणे आवश्यक आहे. कपाशी पिकाच्या फुले, पाते, बोंड अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावास सुरुवात होते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी प्राथमिक अवस्थेत पांढर्‍या रंगाची असून, पूर्ण वाढ झालेली अळी गुलाबी रंगाची असते. अळी अवस्था 9 ते 21 दिवस राहते. त्यानंतर कोषावस्थेत जाते व शेतात खाद्य उपलब्ध असेल, तर पुन्हा पतंगाद्वारे पिकांवर अंडी घालून पुढील पिढीची निर्मिती केली जाते. सुरुवातीच्या काळात अळ्या पाते, कळीवर उपजीविका करते.

 प्रादुर्भाव ग्रस्त पाते व बोंडे गळून पडतात. यंदा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, महसूल विभाग व इतर कापूस उत्पादनाशी संलग्न संस्था यांच्या प्रयत्नाने कपाशी पिकांवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळून आला. तसेच पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्याचे दृष्टीने आतापासून नियोजन करणे अत्यावश्यक आहे.

त्यासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित केल्याशिवाय तरणोपाय नाही. पर्‍हाटी शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या इंधन ब्रिकेटस तयार करणार्‍या कारखान्यांना द्याव्यात. मार्च व एप्रिलमध्ये जमिनीची खोल नांगरणी करावी. जेणेकरून किडीच्या जमिनीत असलेल्या अवस्था वर येऊन उन्हामुळे मरतील किंवा पक्षी त्यांना खातील. कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. या प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शेत तथा बांध स्वच्छ करावे. सर्व कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी उपाययोजना करून पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.